अपघातात शिवश्री मधुकर महाराज बारुळकरांचे निधन
नांदेड (कटूसत्य वृत्त) :- मराठा सेवा संघाचे प्रबोधनकार तसेच संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष शिवश्री मधुकर महाराज बारुळकर यांचे आज सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले. सिडको नांदेड चौकात हा दुर्दैवी अपघात घडला. मराठा सेवा संघ आयोजित शिवमेळा नांदेड येथे दिवसभर सहभाग घेतल्यानंतर ते घरी परतत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
ही बातमी समजताच मराठा सेवा संघासह वारकरी समाजात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव चव्हाण यांनी ही माहिती दिली.
शिवश्री मधुकर महाराज बारुळकर हे मराठा सेवा संघाचे अत्यंत सक्रिय, अभ्यासू आणि प्रबोधनपर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. समाजजागृतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. आपल्या प्रभावी वक्तृत्वातून आणि उदाहरणांद्वारे त्यांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या कार्यपद्धतीत ‘आधी केले, मग सांगितले’ हा दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येत असे.
ते सदा उत्साही, हसतमुख आणि हजरजबाबी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. कुटुंबवत्सल स्वभाव आणि ठाम वैचारिक भूमिका यामुळे समाजात त्यांचा मोठा मान होता. युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिक्षण आणि कर्तृत्वावर भर दिला. त्यांच्या दोन्ही मुलांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवून नोकरी प्राप्त केल्याचेही त्यांच्या कार्याचे उदाहरण म्हणून सांगितले जाते.
मधुकर महाराज बारुळकर यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नव्हे, तर मराठा सेवा संघ आणि वारकरी समाजावरही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने प्रबोधनाच्या चळवळीला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. पंजाबराव चव्हाण यांच्या माहितीनुसार, शिवश्री मधुकर महाराज बारुळकर यांच्यावर उद्या, दि. १ एप्रिल रोजी त्यांच्या मूळ गावी बारुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, तसेच अनावश्यक प्रवास टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शिवश्री मधुकर महाराज बारुळकर यांच्या निधनामुळे समाजाची मोठी हानी झाली असून, त्यांच्या पावन स्मृतींना विविध स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment