पहिल्या राज्यस्तरीय ‘चाचा नेहरू बाल महोत्सवा’चा बक्षीस वितरणाने उत्साहात समारोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य व सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव (सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिला राज्यस्तरीय ‘चाचा नेहरू बाल महोत्सव 2025-26’ उत्साहात पार पडला. तीन दिवस रंगलेल्या या महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा सोमवारी दिमाखात संपन्न झाला.
या महोत्सवात पुणे विभागाने २४ सुवर्ण पदकांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकावला व मानाची चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली. इतर विभागांनीही उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धा रंगतदार केली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (जि.प. सोलापूर) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले होते. प्रमुख उपस्थितीत विभागीय उपआयुक्त संजय माने (पुणे विभाग), पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका शाहीन शेख, सिंहगडचे मुख्य निबंधक डॉ. डी. आय. नवले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय खोमणे, अविनाश मगर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच बाल कल्याण समिती सदस्य सुवर्णा कोकरे, दीपक ढेपे, अमृत सरडे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी किरण सूर्यवंशी, बालाजी अल्लडवाड, समाधान नागणे, विशाल भोसले, अभिजित मोलाने, राहुल चव्हाण, सुवर्णा जाधव, आस्मा आत्तार, प्रतिभा साखरे, भुजंग चिंताकोटे, अक्षय साळुंखे, अच्युत शेवाळे, युवराज गाढवे, शेखर बंडगर, पद्माकर सुरुषे, मिलिंद घाडगे, मारुती ताटे, उज्वला कापसे, पिंकी वावरे, सुप्रिया बेलोशे, सचिन चव्हाण, अमोल जमदाडे, मिथुन पवार, आर. आय. विजापूरे तसेच महिला व बालविकास विभागाच्या कर्मचारीवर्गाचे विशेष सहकार्य लाभले.
तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात धावणे, लांब उडी, रिले, कबड्डी, खो-खो यांसारख्या क्रीडा स्पर्धांसह चित्रकला, निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर आणि समूह नृत्य अशा सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. राज्यभरातून आलेल्या बालकांनी आपल्या क्रीडा व कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
समारोप प्रसंगी मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत, “खेळातून एकात्मता, आत्मविश्वास आणि जीवनात हार न मानण्याची प्रेरणा मिळते,” असा संदेश दिला. एकूणच, पहिल्याच वर्षी भव्य यश मिळवत ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’ हा उपक्रम राज्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला. सूत्रसंचालन गौरी जिंदे व रेश्मा गायकवाड यांनी केले.

No comments:
Post a Comment