टेंभुर्णीत जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 22, 2026

टेंभुर्णीत जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

टेंभुर्णीत जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- इंदिरानगर परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका १९ वर्षीय तरुणासह त्याच्या नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी टेंभुर्णीत घडली. या प्रकरणी आदित्य आप्पा जगताप (वय १९, व्यवसाय गॅरेज काम, रा. इंदिरानगर, टेंभुर्णी) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून प्रज्वल अनिल माने आणि योगेश तुकाराम धोत्रे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेत आदित्य जगताप, प्रथमेश यशवंत जगताप आणि मंडाबाई महादेव जगताप हे तिघे जखमी झाले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आदित्य जगताप हे आरोपी प्रज्वल माने यांच्या घराजवळून जात असताना त्यांना जातीवाचक शब्दांत शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर प्रज्वल माने याने हातातील लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बेंबळे रोडवरील समाधान स्क्रॅप सेंटरसमोर पुन्हा दोन्ही आरोपी आले आणि त्यांनी प्रथमेश जगताप यांच्यावर हल्ला चढवला.

यावेळी आरोपींनी प्रथमेश जगताप यांना जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरत लाकडी दांडक्याने डोक्यात, पाठीवर व हातावर मारहाण केली. मध्ये पडलेल्या मंडाबाई जगताप यांनाही धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. तसेच “आमच्या नादी लागलात तर सोडणार नाही,” अशी धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १३१, ३५१(२), ३५२, ३(५) तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मधील कलम ३(१)(r), ३(१)(s) आणि ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एन. जे. काशीद हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages