सोलापूरमध्ये बनावट ऑनलाइन परीक्षा रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार अटकेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 22, 2026

सोलापूरमध्ये बनावट ऑनलाइन परीक्षा रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार अटकेत

 सोलापूरमध्ये बनावट ऑनलाइन परीक्षा रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार अटकेत




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मल्टीनॅशनल आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध सर्टिफाईड कोर्सेसच्या ऑनलाइन परीक्षा बोगस मार्गाने पास करून देणाऱ्या टोळीचा सोलापूर शहर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अशपाक हेव्जुरहिमान अत्तार (वय ४६) याला अटक करण्यात आली आहे.

सायबर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे १७ एप्रिल २०२६ रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजस्व नगर परिसरात छापा टाकला. येथे घरातून चालवण्यात येणारे कॉल सेंटर उघडकीस आले. अशपाक अत्तार हा मागील दोन वर्षांपासून "Hest Solutions" आणि "Ultra Infotech" या नावाने हे कार्यालय चालवत होता.

प्राथमिक चौकशीत समोर आले की, आरोपी सोशल मीडियावर (Facebook, Instagram, YouTube) जाहिराती देऊन तसेच विविध राज्यांतील व्हेंडर्सच्या माध्यमातून संपर्क साधत असे. तो आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना प्रमोशन, पगारवाढ किंवा इन्सेंटिव्हसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन सर्टिफिकेट परीक्षांमध्ये पास होण्याची हमी देत असे.

या रॅकेटमध्ये अंकिता कोळी, ऐश्वर्या नल्ला आणि इतर ५ ते ६ साथीदारांचा समावेश आहे. आरोपी व्हेंडरमार्फत आलेल्या उमेदवारांकडून १५०० ते २००० रुपये, तर थेट संपर्कात आलेल्या परीक्षार्थ्यांकडून ५००० ते ७००० रुपये घेत असे.

परीक्षेच्या दिवशी उमेदवार स्वतःच्या किंवा पुरवलेल्या संगणकावर लॉग इन करताच, स्क्रीन शेअरिंग सॉफ्टवेअरद्वारे संपूर्ण प्रवेश आरोपींकडे जात असे. त्यानंतर प्रश्नांचे स्क्रीनशॉट घेऊन ते Gemini आणि ChatGPT सारख्या AI टूल्सवर टाकून उत्तरे मिळवली जात. उमेदवार फक्त स्क्रीनसमोर बसून राहायचा आणि संपूर्ण परीक्षा आरोपींच्या मदतीने पूर्ण केली जात होती.

पोलिसांच्या तपासानुसार, गेल्या दोन वर्षांत या टोळीने सुमारे ३००० ते ४००० परीक्षार्थ्यांना अशा पद्धतीने पास करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कमाई केली आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३(५), ६१२ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६, ६६C आणि ६६D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाप्यात १२ लॅपटॉप, ८ CPU, ७ प्रोजेक्टर, ७ CCTV DVR, ७ मोबाईल फोन आणि विविध बँकांचे चेकबुक्स असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला २१ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांच्या पथकाने केली.

नागरिकांना आवाहन

सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा बेकायदेशीर मार्गाने परीक्षा पास करून देणाऱ्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीची माहिती तात्काळ सायबर पोलीस ठाण्याला द्यावी तसेच ऑनलाइन फसवणुकीसाठी १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages