सोलापूरात गॅस टंचाईचा फटका; 500 हून अधिक रिक्षा ठप्प
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा फटका आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला असून सोलापूर शहरातील एलपीजी गॅसवर चालणाऱ्या सुमारे 500 हून अधिक रिक्षा, कार तसेच काही मालवाहतूक वाहने बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. पुढील किमान पाच ते सहा दिवस गॅसचा पुरवठा होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत.
शहरातील अनेक गॅस पंपांवर गेल्या 10 ते 11 दिवसांपासून एलपीजीचा पुरवठा ठप्प आहे. काही ठिकाणी रविवारीपासूनच तुटवडा तीव्र झाला असून वाहनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
रिक्षाचालकांवर आर्थिक संकट
एलपीजीवर अवलंबून असलेल्या रिक्षाचालकांचे उत्पन्न थेट ठप्प झाले आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून कंत्राटी रिक्षाचालकांना अक्षरशः घरी बसण्याची वेळ आली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांसमोर पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय उत्तर द्यावे, असा पेच निर्माण झाला आहे.
प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह..
प्रशासनाकडून गॅस टंचाई नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला असून याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
.png)
No comments:
Post a Comment