प्रादेश‍िक पर‍िवहन कार्यालयाकडून 428.87 कोटी रुपयांची महसूल वसुली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2026

प्रादेश‍िक पर‍िवहन कार्यालयाकडून 428.87 कोटी रुपयांची महसूल वसुली

 प्रादेश‍िक पर‍िवहन कार्यालयाकडून 428.87 कोटी रुपयांची महसूल वसुली

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सन 2025-2026 या आर्थिक वर्षात प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकलूज यांनी महसूल वसुलीत उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. परिवहन कार्यालयाकडून देण्यात आलेल्या 389.62 कोटी रुपयांच्या उद्दिष्टांच्या तुलनेत प्रत्यक्ष 428.87 कोटी रुपयांची महसूल वसुली करण्यात आली असून, हे उद्दिष्टाच्या 110 टक्के आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वायुवेग पथकांमार्फत कठोर कारवाई करण्यात आली. हेल्मेट न वापरणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, सीटबेल्टचा अभाव, विमा व पीयूसी नसलेली वाहने, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण नसलेली वाहने, रिफ्लेक्टर टेल लॅम्प नसलेली वाहने, विना अनुज्ञप्ती वाहन चालविणे तसेच क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या अंतर्गत एकूण 27,175 चलान जारी करण्यात आले. या कारवाईतून 14 कोटी रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले असून, हे 19 कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या 73.72 टक्के आहे.
वाहन नोंदणीच्या बाबतीतही दोन्ही कार्यालयांनी लक्षणीय प्रगती केली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे 87,128 नवीन वाहनांची नोंदणी झाली असून त्यातून 227 कोटी 6 लाख रुपयांचा कर ऑनलाईन प्राप्त झाला आहे. तर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकलूज येथे 41,750 वाहनांची नोंदणी होऊन 92 कोटी 22 लाख रुपयांचा कर प्राप्त झाला आहे.
ई-वाहनांच्या नोंदणीतही वाढ दिसून येत आहे. सोलापूर कार्यालयात 8,128 ईलेक्ट्रीक दुचाकी व 329 चारचाकी वाहनांची नोंदणी झाली असून, अकलूज येथे 90 दुचाकी व 1 चारचाकी ई-वाहनांची नोंद झाली आहे.
HSRP नंबर प्लेट बसविण्याच्या मोहिमेतही प्रगती झाली आहे. सोलापूर कार्यालयात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या 9,26,839 वाहनांपैकी 2,60,546 वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. तर अकलूज कार्यालयात 1,98,122 वाहनांपैकी 82,078 वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत.
एकूणच, महसूल वसुली, नियमभंगावरील कारवाई, वाहन नोंदणी आणि ई-वाहन प्रोत्साहन या सर्व बाबींमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाने उल्लेखनीय प्रगती साधली असून शासनाच्या उद्दिष्टपूर्तीस मोठा हातभार लावला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages