चैत्रवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास बंदी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चैत्रवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळांच्या परिसरात कलम 163 अन्वये ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, दिनांक 25 मार्च 2026 ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर ड्रोन उडविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान लाखो वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने सुरक्षा उपाययोजनांचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
संभाव्य दहशतवादी धोका तसेच ड्रोनद्वारे घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. या अंतर्गत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूर आणि श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट यांसह जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर ड्रोन उडविण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व ड्रोन परवाना धारक व चालकांनी त्यांच्या ड्रोनची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा आदेश 25 मार्च 2026 पासून पुढील 60 दिवस सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) तसेच सर्व नगरपालिका हद्दीत लागू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
.png)
No comments:
Post a Comment