रिक्षावाल्याचा मुलगा कृषी विद्यापीठात पहिला, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गोल्ड मेडल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

रिक्षावाल्याचा मुलगा कृषी विद्यापीठात पहिला, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गोल्ड मेडल

 रिक्षावाल्याचा मुलगा कृषी विद्यापीठात पहिला, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गोल्ड मेडल



बार्शी (कटूसत्य वृत्त):- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर बार्शीतील चैतन्य निहालकुमार व्हनकळस याने कृषी शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रिक्षाचालकाच्या मुलाने एमएस्सी (हॉर्टीकल्चर – व्हेजिटेबल सायन्स) या विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत ‘बीएसएस सुरेश अग्रवाल सुवर्णपदक’ पटकावले आहे. राहुरी कृषी विद्यापीठात पार पडलेल्या ३९ व्या पदवीदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते चैतन्यला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

साध्या कुटुंबातून आलेल्या चैतन्यसाठी हा क्षण संघर्षाच्या यशस्वी प्रवासाचा परिपाक ठरला. चैतन्यचे वडील निहालकुमार व्हनकळस हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ दिली नाही. आई रोहिणी, आजी कस्तुरबाई आणि भाऊ प्रविण यांनीही त्याला सतत प्रोत्साहन दिले. बार्शीतील कर्मवीर मामासाहेब जगदाळे शैक्षणिक संकुलात चैतन्यचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर बारामती कृषी महाविद्यालयातून बीएस्सी (ॲग्री) पूर्ण करून त्याने एमएस्सी (हॉर्टीकल्चर) मध्ये प्रवेश घेतला. पहिल्याच वर्षी ‘प्रतिभा पवार गोल्ड मेडल’ मिळवत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली. दुसऱ्या वर्षातही उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवत अखेर विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला.

चैतन्यचे हे यश कष्टकरी व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “परिस्थिती नव्हे, तर जिद्द माणसाला मोठं बनवते,” हा संदेश त्याने आपल्या यशातून दिला आहे. सध्या बार्शी शहरासह परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages