वादळी वारे, गारांच्या पावसाने शेतकऱ्यांचे कष्ट मातीत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 24, 2026

वादळी वारे, गारांच्या पावसाने शेतकऱ्यांचे कष्ट मातीत

 वादळी वारे, गारांच्या पावसाने शेतकऱ्यांचे कष्ट मातीत



सोलापुरात बळीराजाच्या डोळ्यात पाणी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी (ता. १९) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीने बळीराजावर अक्षरशः दुहेरी आघात केला. गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशीच निसर्गाच्या या अवकाळी प्रकोपामुळे द्राक्ष, आंबा, ज्वारी, गहू, हरभरा आणि कांदा या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे.

दिवसभर कडक उन्हामुळे वातावरण तापलेले असतानाच सायंकाळी पाचनंतर अचानक हवामानात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसाने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या पावसात अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि गारपीटही झाली. यामुळे शेतातील उभी पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली.

उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील शेतकरी अंकुश सिरसट यांच्या द्राक्षबागेला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. रात्री सव्वा अकराच्या सुमारास आलेल्या वादळात त्यांची तीन एकर द्राक्षबाग पूर्णपणे कोसळली. यंदा द्राक्षाला चांगले बाजारभाव मिळत असतानाच, डोळ्यांदेखत सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याने सिरसट कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्याचबरोबर बेदाणा तयार करण्यासाठी ठेवलेल्या रॅकवरील सुमारे ६० ते ८० लाख रुपयांच्या मालाचेही मोठे नुकसान झाले आहे.

माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी, उपळाई खुर्द, मोडनिंब परिसरातही गारपिटीने थैमान घातले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढणीस आलेली पिके पूर्णपणे मातीमोल झाली आहेत. बार्शी तालुक्यातील वैराग आणि पानगाव पट्ट्यातही अवकाळी पावसाने कहर केला. वैराग, काळेगाव, पिंपरी साकत या भागातील उभी पिके भुईसपाट झाली असून सुगीचा हंगामच कोलमडला आहे.

उपळाई खुर्द परिसरात आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात गळून पडला असून चिकूची फळेही झाडावरून खाली कोसळली आहेत. त्यामुळे फळबागधारक शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी आणि मजुरांची मोठी धावपळ उडाली. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली.

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माढा, बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शासनाने त्वरित मदतीचा हात दिला नाही, तर आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या नैसर्गिक आपत्तीने पुन्हा एकदा बळीराजाचे कंबरडे मोडले असून, सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे. आता शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages