महापालिकेच्या आठ रुग्णवाहिका धूळखात; चौकशीची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त): सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील आठ रुग्णवाहिका गेल्या अनेक महिन्यांपासून विनावापर धूळखात पडल्या असून खासगी रुग्णवाहिका चालकांच्या संगनमताने आर्थिक घोटाळा झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
बुधवारी अमोल शिंदे यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिका स्थानकाला भेट दिली असता ही धक्कादायक स्थिती समोर आली. महापालिकेकडे एकूण १५ रुग्णवाहिका असून त्यापैकी काही रुग्णवाहिका तीन वर्षांपूर्वी आमदार निधीतून खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र १५ पैकी आठ रुग्णवाहिका पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्याकडून याबाबत माहिती घेतली. रुग्णवाहिका सेवेत येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी माहिती दिली.
शिंदे यांनी आरोप केला की, २०२२ ते २०२४ या कालावधीत रुग्णवाहिका खरेदी प्रक्रियेदरम्यान तब्बल २३ वेळा फेरफार करण्यात आले. एवढ्या फेरफारानंतरही अनेक रुग्णवाहिका बंद अवस्थेत असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नागरिकांना वेळेवर सेवा मिळाली नाही तर आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
चालकांना वेतन देण्यासाठी निधी नसल्याचे कारण दिले जात असल्यास तेही चुकीचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. रुग्णवाहिकांसाठी निधी नसल्याचे सांगितले जात असेल, तर अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या बंद कराव्यात. काही पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवर दोन-दोन चालक असताना रुग्णवाहिकांसाठी चालक नाहीत, ही सोलापूरकरांसाठी दुर्दैवी बाब असल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला.

No comments:
Post a Comment