मनपा कार्यक्षेत्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 12, 2026

मनपा कार्यक्षेत्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

 मनपा कार्यक्षेत्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

सोलापूर (कटूसत्य वृत्त): महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोलापूर महापालिकेच्यावतीने शहरात एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

महिला दिनाचे औचित्य साधून महापौर विनायक कोंदयाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे तसेच विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

एचपीव्ही लस मुली आणि महिलांना गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण देते. देशात आढळणाऱ्या कर्करोगांपैकी गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून या आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या महिलांचे प्रमाणही मोठे आहे. ह्यूमन पपीलोमा व्हायरस (HPV) या विषाणूच्या संसर्गामुळे हा कर्करोग होतो. या आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी तीन महिन्यांत शहरातील वयाची १४ वर्षे पूर्ण केलेल्या पण अद्याप १५ वर्षे पूर्ण न झालेल्या सुमारे आठ ते दहा हजार मुलींना ही लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलीची नोंदणी ‘यू-विन’ या संकेतस्थळावर करावी किंवा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनही नावनोंदणी करता येणार आहे.

ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता पालकांनी आपल्या मुलींना लस देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या महापालिका आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानातील अजमेर येथे देशव्यापी एचपीव्ही लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages