बेपत्ता महिला-मुलींच्या शोधासाठी राज्यात विशेष पथक
मुंबई (कटूसत्य वृत्त): राज्यातील हरवलेल्या महिला व अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक (स्पेशल स्क्वॉड) स्थापन करून व्यापक मोहिमा राबविण्यात येणार असून, हरवलेल्या महिला-मुली सापडण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्यात मुली बेपत्ता होण्याच्या घटनांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. उपलब्ध आकडेवारीनुसार २०२५ या वर्षात राज्यात ४८,२७८ महिला हरवल्या, त्यापैकी ३६,५८१ महिला शोधण्यात यश आले. तसेच १२,११३ अल्पवयीन मुली हरवल्या, त्यापैकी १०,२९५ मुली सापडल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबई शहरात १ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत ३०२ मुले-मुली हरवल्याच्या घटना नोंदल्या गेल्या असून त्यापैकी २९७ जणांचा शोध लागला. नवी मुंबई परिसरात जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ५१९ मुले-मुली हरवले, त्यातील ४९४ जण सापडले. तर नागपूर आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी २०२४ ते मे २०२५ या कालावधीत ५,८८६ व्यक्ती हरवल्या, त्यापैकी ५,१६९ जणांचा शोध लागला आहे.
दरम्यान, राज्यात नवजात बालक विक्रीप्रकरणी चंद्रपूर, मुंबई, ठाणे, पुणे व पिंपरी-चिंचवड या पाच पोलीस आयुक्तालयांत पाच गुन्हे नोंदविण्यात आले असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
हरवलेल्या मुला-मुलींच्या शोधासाठी उपाय
हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी निर्भया पथक, ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध अशा विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. याशिवाय महिला मदत कक्ष, १०३, १०९१ व ११२ या २४ तास सुरू असलेल्या हेल्पलाईन सेवा तसेच शाळांचे सेफ्टी ऑडिट असे उपक्रमही राबविण्यात आले आहेत.
तसेच विशेष सेल स्थापन करून दर महिन्याला बैठक घेण्यात येते. प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींचा पाठपुरावा केला जातो. त्यामुळे वर्षभरात हरवलेल्या व्यक्ती सापडण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले असून सध्या ते ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत आहे. हे प्रमाण पुढील काळात ९५ ते ९७ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment