बार्शीतील उद्यानांचा होणार कायापालट; महिलांसाठी स्वतंत्र जिम उभारणार- तेजस्विनी कथले
बार्शी (कटूसत्य वृत्त):- शहरातील सर्व सार्वजनिक उद्याने सुस्थितीत करून त्यांचा सर्वांगीण विकास केला जाणार असून महिलांसाठी स्वतंत्र जिमची सुविधा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती बार्शीच्या नगराध्यक्ष तेजस्विनी कथले यांनी दिली.
सध्या शहरातील काही उद्यानांमध्ये स्वच्छतेचा अभाव, तुटलेली बाके, निष्क्रिय खेळ साहित्य तसेच प्रकाशयोजनेची कमतरता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून सर्व उद्यानांची पाहणी करून टप्प्याटप्प्याने दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.
महिलांच्या आरोग्याचा विचार करून निवडक उद्यानांमध्ये अत्याधुनिक ओपन जिम उपकरणे बसवली जाणार आहेत. त्यामुळे महिलांना सकाळ-संध्याकाळ सुरक्षित वातावरणात व्यायामाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, शहरातील सार्वजनिक बागांची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच शहरातील बागांचे पुनर्जीवन करण्यात येईल, असे आश्वासन माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिले आहे.
शहरातील विविध भागांतील बागांमध्ये तुटलेली खेळणी, मोडकी बाके, वाढलेले गवत तसेच स्वच्छतेचा अभाव दिसून येत असल्याने लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच बागांचा योग्य उपयोग करता येत नाही.
या स्थितीची दखल घेत राजेंद्र राऊत यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून बागांची स्वच्छता, दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शहरातील बागा पुन्हा आकर्षक व नागरिकांसाठी उपयुक्त बनवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बागांचे पुनरुज्जीवन झाल्यास नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित व सुंदर जागा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment