एनबीएन सिंहगडमध्ये दोन दिवसीय ‘नवोन्मेषकांचा प्रशिक्षण शिबिर’ यशस्वी संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या नवोन्मेष, उद्योजक घडवणूक (इन्क्युबेशन) आणि संलग्नता विभाग (IIL) या
विभागाच्या वतीने तसेच एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर यांच्या सहकार्याने ‘Bootcamp for Innovators’ हा दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. 27 व 28 फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला.
या बूटकॅम्पचे आयोजन महाविद्यालयाच्या ईएनटीसी सेमिनार हॉल, ग्रंथालय इमारत येथे करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, उद्योजकता व स्टार्टअप संस्कृती विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात प्र. कुलगुरू डॉ . एल बी दामा यांनी मार्गदर्शन करीत असताना शहर आणि जिल्हा याचा सुवर्णमध्य म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूट असल्याने हा कार्यक्रम येथे आयोजित केल्याचे सांगत कौतुक केले. यावेळेस सोलापूर विद्यापीठाचे तसेच पीएम उषाचे समन्वयक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळेस कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले यांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण विचार, संशोधन व उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले. यावेळेस उद्योगवर्धिनीच्या सर्वेसर्वा चंद्रीकाताई चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाविषयी, बाजारपेठेतील मागणीसह करिअर क्षेत्रातील विविध संधीवर मार्गदर्शन केले.
पहिल्या दिवशी डिझाईन थिंकिंग, उद्योजकता तसेच प्रोटोटाइप ते मार्केटिंग व डेव्हलपमेंट या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले. वॉलचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्स, सोलापूर येथील तज्ज्ञ प्राध्यापक डॉ . अनिलकुमार कट्टी, अर्चना इंजल, डॉ. वैशाली यारगडे यांची सत्रे झाली. सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
दुसऱ्या दिवशी बौद्धिक संपदा हक्क (IPR) या विषयावर प्रा. शशिकांत हिप्परगी यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण केले. या सत्रातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला योग्य दिशा व व्यासपीठ मिळाले.
समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे उद्योग, स्टार्टअप व संशोधन क्षेत्रात करिअर घडविण्यास प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती, मार्गदर्शक व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनामुळे व प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे मर्यादित कालावधीतही हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्यात आला.
सूत्रसंचालन प्रा. एम के जाधव यांनी केले. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. सुनिल शाखापुरे यांनी काम पाहिले.
✓ नियोजनावर समाधान
उपकुलसचिव डॉ. एल बी दामा यांनी कमी वेळेत सिंहगड इन्स्टिट्यूटने केलेल्या नियोजनावर समाधान व्यक्त केले. शहर आणि जिल्हा यांचा समन्वय साधावा म्हणून सिंहगडला प्राधान्य दिल्याचे सांगत लवकर सिंहगडवर आणखी एक उपक्रम सोपवला जाणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशीच्या समारोपात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

No comments:
Post a Comment