साेलापूरातील गणवेश निर्मितीच्या कामाला हिरवा कंदील
३५ हजार कामगारांना मिळणार राेजगार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्यात बंद होणे, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे कापड उद्योगावरील संकट गंभीर झाले होते. अडचणीत आलेल्या सोलापूरच्या या उद्योगाला राज्य शासनाने मोठा दिलासा देत, गणवेश निर्मितीच्या कामाला हिरवा कंदील मिळाल्याने सुमारे ३५ हजार शिलाई कामगारांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांची गणवेश निर्मिती विस्कळीत झाली होती. राज्य शासनाने स्थानिक उद्योगांना काम न देता केंद्रीय पद्धतीने कापड खरेदी करून सोलापूरच्या कापड उद्योगाला अडचणीत आणले होते. त्याचा जबरदस्त फटका हजारो कामगारांना बसला होता.
त्यानंतर या वर्षी नेमके काय होणार, असा प्रश्न समोर होता. त्यातच जागतिक युद्धाला तोंड फुटले आहे. या युद्धामुळे सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसला आहे. निर्यातीसाठी तयार असलेला माल शिपमेंट नसल्याने पडून आहे. तसेच नव्या ऑर्डरही मिळेनाशा झाल्या आहेत. त्यातच पेट्रोलियम पदार्थांशी संबंधित कच्च्या मालाचे दर अडीच ते तीनपट वाढले आहेत. त्यामुळे हे संकट दुहेरी झाले आहे.
या स्थितीत आता जिल्हा परिषद शाळांची गणवेश निर्मिती हीच एकमेव आशा कापड उद्योगासमोर उभी होती. मात्र, गणवेश निर्मितीची प्रक्रिया पाच ते सहा महिने आधीपासून करावी लागते. त्यामुळे शासनाचे आदेश वेळेत मिळणे गरजेचे आहे. त्यावर राज्य शासनाच्या शिक्षण खात्याचे राज्य प्रकल्प समन्वयक गोविंद कांबळे यांनी प्राथमिक व महानगरपालिका शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. गणवेशाच्या संदर्भात केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियानाने अद्याप मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. मात्र, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवे गणवेश मिळावेत यासाठी आतापासूनच नियोजनाचे संकेत दिले आहेत. तसेच वार्षिक परीक्षा संपण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या गणवेशाची मापे घेतली जावीत, असे स्पष्ट कळवले आहे. त्यामुळे गणवेश उद्योगांना शिलाईचे काम सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत.

No comments:
Post a Comment