गारपीट अवकाळीचा पिकांना तडाखा; बळीराजा संकटात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात मंगळवारी (ता.१७) विविध भागांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली. यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
यावर शेतकरी वर्गाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
हिंगोली अन् लातूरमध्ये फळबागांना मोठा फटका यात हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे हळद, आंबा आणि कलिंगड पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः काढणीला आलेला आंबा जमिनीवर पडल्याने बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर लातूर जिल्ह्यातील चाकूर, औसा आणि निलंगा भागातही ७० एकरांवरील आंबा बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. मागील वर्षाचे नुकसान भरून निघण्याआधीच यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
धाराशिव आणि सांगलीत द्राक्ष अन् हळदीचे नुकसान
धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी (ता.१७) सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात लोहारा तालुक्यात अनेक बागा जमीनदोस्त झाल्या असून, द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी पुढे येत नसल्याने साठवलेला माल सडू लागला आहे.
तर, दुसरीकडे, सांगली जिल्ह्यात हळद उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात वाळत घातलेली हळद पावसामुळे कुजायला लागली असून, ७० ते ८० टक्के पीक वाया गेल्याचे शेतकरी सांगत आहे.
अक्कलकोटमध्ये धान्याची नासाडी; तर गडचिरोलीत मिरची पिकावर संकट
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात गारपिटीमुळे ज्वारी आणि गहू पिके आडवी झाली आहेत. ही पिके वर्षभराच्या अन्नाची सोय करणारी असल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे.
तसेच, गडचिरोली जिल्ह्यातही मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर गारांचा थर साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कृषीमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासनासह; पंचनाम्यांचे आदेश
दरम्यान, या गंभीर परिस्थितीवर कृषीमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली असून, पुढील ४८ तास २४ जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले आहे. तसेच, बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, नुकसान भरपाईसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
.jpg)
No comments:
Post a Comment