लंपट ज्योतिषाचा राजकीय झंटा-फंटा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

लंपट ज्योतिषाचा राजकीय झंटा-फंटा

लंपट ज्योतिषाचा राजकीय झंटा-फंटा




"दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए" हे नाशिकचा लिंगपिसाट ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने पुन्हा दाखवून दिलंय. अशाच्या बदकर्मी धंद्याचं मार्केटिंग "महाराष्ट्र राज्य महिला आयोग"च्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी करावं, ह्यात धक्कादायक काही नाही. ही युतीदेखील नवी नाही.


    थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी (जन्म : २४ ऑगस्ट १८८०; निधन :  ३ डिसेंबर १९५१) ह्या निरक्षर होत्या. पण त्यांच्याकडे अद्भुत प्रतिभा, मर्मभेदी दृष्टी आणि विलक्षण समाजभान होतं. म्हणूनच त्यांनी ठणकावून सांगितलंय -

नको नको रे ज्योतिषा।

माझ्या दारी नको येऊ।

माझे दैव मला कळे।

माझा हात नको पाहू॥१


म्हणे नशिबाचे नऊ ग्रह।

तळहाताच्या रेघोट्या।

बापा नको मारू थापा।

अशा उगा खऱ्या खोट्या॥२

अशा खणखणीत शब्दांत बहिणाबाईंनी दारी आलेल्या ज्योतिष्याला हाकललंय. याउलट, ज्याला महिला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात त्या कॅप्टन अशोक खरात ह्या ज्योतिष्याला नाशिक पोलिसांनी अटक केलं; त्याच्या दारी सुशिक्षित, मान्यवर मंडळी जायची. त्याच्या दर्शन- मार्गदर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राधाकृष्ण विखे, दादा भुसे यांच्यासह आठ मंत्री नाशिकला अशोक खरातच्या मंदिर- आश्रमात जायचे. त्याच्या डोक्यावर छत्री धरलेले "राज्य महिला आयोग" अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीचे फोटो "सोशल मीडिया"तून व्हायरल झाले आहेत. ह्या नराधमाला अटक करताना पोलिसांनी जे पेनड्राइव्ह जप्त केले; त्यात ५८ महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्देमाल सापडलाय. तोही त्याचा "ऑफिस बॉय" संशयित नीरज जाधव ह्याने पैशाच्या लालसेपायी अशोक खरातला ब्लॅकमेलिंग (५ कोटी रुपये) केल्याने उघड्यावर आलाय.

  त्र्यंबकेश्वर- नाशिक येथे दर १२ वर्षांनी होणाऱ्या "सिंहस्थ" कुंभमेळ्याला ३१ ऑक्टोबर २०२६ पासून प्रारंभ होत आहे. हा कुंभमेळा ४५ अमृत (शाही) स्नानांसह दीड वर्ष चालेल. त्यातील भोंदूगिरीचा हा भयानक "ट्रीझर" ज्योतिषी अशोक खरात आणि पारनेर (जिल्हा : अहिल्यानगर) येथील १८ वर्षांच्या मुलीला तिच्या आई- वडिलांचा, भावाचा खून करण्याची धमकी देऊन गेली ५ वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या वारकरी बुवा हभप अण्णा गुंजाळ ह्या कीर्तनकाराने दाखवला आहे. स्वतःला संत, महंत, साधू , बुवा- महाराज आणि ज्योतिषी म्हणून घेणारी ही मंडळी एकाच माळेचे मणी आहेत. ह्या साऱ्यांचीच  छिनाल छाप वेद, उपनिषद आणि पुराण कथांवर असते. सापडत नाहीत, तोपर्यंत हे "संधिसाधू"च असतात. हे तांदळातल्या खड्यांसारखे आहे. हे खडे निवडेपर्यंत तांदळाच्या पोत्यात तांदूळ म्हणूनच असतात.z  असाच ज्योतिषी अशोक खरात होता. तो स्वतःला "अंकशास्त्रज्ञ" (न्यूमरोलॉजिस्ट) आणि 'कॅप्टन' म्हणवून घ्यायचा. "मर्चंट नेव्ही"मधून अधिकारी म्हणून आपण निवृत्त झाल्याचे सांगायचा. ह्या खोट्या ओळखीचा वापर करून त्याने स्वतःला बड्या राजकीय नेत्यांशी जोडून लोकांचा विश्वास संपादन केला होता. हा भोंदूगिरीचा "झंटा" आणि त्यात "मी कृष्ण, तू राधा" म्हणत होणारा महिलांच्या लैंगिक शोषणाचा "फंटा" नवा नाही.  ( हे "झंटा- फंटा" शब्द बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात "भाजप" आमदार सुरेश धस यांनी जोरदारपणे वापरले होते.)

 आठ वर्षांपूर्वी अमरावतीतील पूर्णा नदीकाठच्या नृसिंह मठाचा प्रमुख "बालयोगी ब्रह्मचारी महाराज" (मूळनाव : मुरलीधर तायडे) सेक्स- सीडीमध्ये सापडला होता. त्याने बाथरूमचा "भोगखाना" बनवला होता. अशा "लिंगपिसाट" महाराजांपैकी कोल्हापूरचा तोडकर महाराज रंगेहाथ पब्लिकच्या तावडीत सापडला होता. (जानेवारी २००५) शिवलिंग महादेव तोडकर हा "महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ" (एमएसईबी)मध्ये कारकून होता. त्याची भविष्य कथनाची पद्धत अंकाशास्त्राशी संबंधित नसली तरी आकड्यांशी होती. त्याच्या येणाऱ्या गिऱ्हाईकाने जन्मकुंडली स्वतःच्या हातात ठेवायची. त्याला तोडकर महाराज एक संख्या मनात घडण्यास सांगे. ती धरल्याचे गिऱ्हाईकाने सांगितले की, तोडकर महाराज त्या संख्येतून १७ वजा करण्यास सांगायचा. त्यानंतर येणाऱ्या संख्येला ९ ने गुणायचे. जो गुणाकार यायचा; तो आकडा गिऱ्हाईकाने सांगताच, तोडकर महाराज म्हणायचा, "तीच तुझी जन्मतारीख !" अशाच प्रकारे मुंबईतील कुर्ला येथील कर्वे गुरुजी आणि त्यांची मुलगी पिंकी, हे केवळ चेहरा पाहून भविष्य विचारायला येणाऱ्याची जन्मतारीख सांगत. अर्थात, ही पहिल्याच झटक्यात गिऱ्हाईक पक्कं करण्याची ट्रिक होती. ह्या जोरावर तोडकर महाराजने प्रचंड माया जमवली. वीज मंडळाच्या कारकुनाला ज्योतिष विचारायला वीजमंत्री यायचा. 

कोल्हापुरात कोणी बडा राजकीय नेता, कलावंत, प्रशासकीय अधिकारी आला की, त्यांना महाराजांचे चमचे- नमते महाराजांच्या सिद्धी-चमत्काराच्या करामती ऐकवून त्यास गंजीमाळ परिसरातील "द्रोणागिरी" आश्रमात नेत. त्यापैकी काहींना तोडकर  पदव्या- उपाध्या  देऊन आपले करीत. अशाप्रकारे गळाला लागलेले भक्त तोडकर महाराजाला आपल्या संस्था- संघटनेच्या कार्यक्रमासाठी मुंबई- पुण्याला नेत. त्यावेळी महाराजांबरोबर विमानातून जाण्यासाठी बड्या- श्रीमंत भक्तांमध्ये चढाओढ लागायची. या साऱ्या बनावामुळे तोडकर महाराज कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाचे मानचिन्ह झाला होता. परंतु, वसई- भाईंदर येथून भविष्य समजून घेण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या दोन तरुणींनी आश्रमातल्या "खास खोली"तील तोडकर महाराजाचे अश्लील उद्योग जगजाहीर केले. त्याची पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यातून कोल्हापुरात तोडकर महाराजाविरोधात लोकांदोलन उभे राहिलं. पोलीस त्याला जामिनासाठी कोर्टात नेत असताना, लोकांनी चपलेनं‌ बडवलं. ब्रह्मचारी हनुमंताच्या आडोशाने लैंगिक खेळ खेळणाऱ्या तोडकर महाराजचं थोबाड हुप्प्या वानर  दिसावा, इतकं सुजवलं. त्याच्या केसचा निकाल तो मरेपर्यंत (५ फेब्रुवारी २०१५) लागला नाही. त्याचा मात्र आश्रम अजूनही आहे. 

 १९९१ मध्ये नागपुरातील एका भक्ताच्या मुलीवर बलात्कार करणारा कृपाळू महाराज, त्या गुन्ह्याबद्दल ७ वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला आणि "आस्था" आणि "संस्कार" टीव्ही चॅनलवरून प्रवचनं देऊ लागला. अंगावर जिवंत साप घेऊन "नागीन डान्स"साठी प्रसिद्ध असणाऱ्या स्वामी भीमानंद ह्याला प्रवचनाला येणाऱ्या मुलींना "सेक्स रॅकेट"मध्ये फसवल्याच्या आरोपाखाली (२०१० मध्ये) अटक झाली होती. बंगळूरचा स्वामी नित्यानंद यालाही तमिळ अभिनेत्री बरोबरचा सेक्स व्हिडिओ "लीक" केला म्हणून पोलिसांनी अटक केली होती. अशाचप्रकारे दोन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू जेलबंद झाला. (२०१३) सोबत, त्याचा मुलगा नारायण साई हादेखील सुरतमधील दोन मुलींवर (दोघी बहिणी होत्या.) बलात्कार केल्याच्या आरोपाखाली जेलबंद झाला. तरीही आसाराम बापूच्या देशभरातील शेकडो आश्रमांपैकी एकाचीही वीट हलली नाही. ह्या नाकर्तेपणाची पैदास "जे जे होईल, ते पहावे; चर्चा करावी आणि गप्प बसावे," या सामाजिक षंढपणातून झाली आहे. 

३५ वर्षांपूर्वी धुळ्याचे भास्कर वाघ प्रकरण गाजलं होतं. तोही तोडकर महाराजांसारखा सरकारी कारकून होता. त्याने महाराज बनून सरकारी तिजोरीतील १४ कोटी रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे, तेव्हा भ्रष्टाचारविरोधी प्रशासकीय अधिकारी (IS)अशी ख्याती असलेले सदाशिवराव तिनईकर हे ह्या लफंग्या महाराजांचे भक्त होते. असा इतिहास असेल, तर नटण्या- दिसण्यासाठीच अधिक प्रसिद्ध असणाऱ्या रुपाली चाकणकर आणि ज्योतिषी अशोक खरात ह्यांच्या कनेक्शनचे काय घेऊन बसलात! तरीही, कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात यांच्या प्रकरणाला वाचा फुटल्यावर "महाराष्ट्र राज्य महिला आयोग"च्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्यांचे नाव विशेष चर्चेला आलं. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. कारण रुपाली चाकणकर यांनी "गुरुमाऊली" मानलेल्या खरात ह्याचे कारनामे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत.

 "सोशल मीडिया"वर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर नराधम खरातचा गौरव करताना म्हणतात, "आईने मला जन्म दिला म्हणून, आई माझी गुरू! वडिलांनी मला शिक्षणाची योग्य संधी दिली, म्हणून ते माझे गुरू! पण मी कोण? माझा जन्म कशासाठी आहे? मी काय काम केलं पाहिजे? ह्याचं मार्गदर्शन अशोक खरात यांनी केल्याने, माझं सारं अस्तित्व हे गुरुमाऊली हेच आहेत !" आपल्या ह्या अंधभक्तीमुळे शेकडो मुली- महिलांचे आयुष्य उद्धवस्त झालीत, ह्याचे भान चाकणकर बाईंना आता तरी आले आहे का? "लोक अशांकडे श्रद्धेने जातात. तशाच प्रकारे रुपाली चाकणकर गेल्या असतील," अशी सारवासारव  नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलीय. ती खोटी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

एथ वडील जें जें करिती। 

तया नाम धर्मु ठेविती।

तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ॥

(ज्ञानेश्वरी, अध्याय ३, ओवी १५८ )

     अर्थात, "थोर लोक (नामवंत, मान्यवर) जे कर्म आचरतात; त्यालाच सामान्य लोक "धर्म" म्हणत त्याचे आचरण करतात." ह्यातून मान्यवर, सेलिब्रिटी, शासक, प्रशासक ह्याचं आचरण/ वर्तन कसे आणि कोणत्या प्रतीचे असावे, ते सांगितले आहे. ह्या अपेक्षेस पात्र नसल्याचे रुपाली चाकणकर यांनी डॉ. संपदा मुंडे आणि वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात यापूर्वीच दाखवून दिलेय. आता तर त्यांची अंधभक्ती ही बोगस कॅप्टन व लंपट ज्योतिषी असलेल्या अशोक खरात याच्या बदकर्मी उद्योगाची मार्केटिंग करणारी ठरलीय. अशोक खरातच्या शिष्या आणि त्याच्या "श्री शिवालिक संस्था"च्या विश्वस्त असलेल्या रुपाली चाकणकर आता पीडित महिलांना कोणत्या तोंडाने काय न्याय देणार? आणि भटभिक्षुकांच्या पौरोहित्याप्रमाणेच ज्योतिषाला शैक्षणिक दर्जा देणारे  सरकार कोणत्या तोंडाने अशोक खरातला शिक्षा करणार? चाकणकर बाईंनी "राज्य महिला आयोग" अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. हे ज्योतिषाच्या भाषेत गंडांतर असले तरी प्रत्यक्षात ते बदकर्माच्या साथीदारीचे फळ आहे.


    ज्योतिष किंवा भविष्यकथन हे थोतांड असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. २० दिवसांपूर्वी इस्राएल- इराण युद्ध सुरू झालंय. त्याच वेळी दुबईत ज्योतिष्यांची परिषद होती. युद्धामुळे आखातातील विमान वाहतूक थांबल्याने ज्योतिषी दुबईत अडकून पडले. तिथल्या युद्धजन्य परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येक ज्योतिषी आपल्या देशाच्या- राज्याच्या शासक - प्रशासकांकडे मदतीसाठी फोन करू लागला. यातून, "ज्यांना आपल्या भविष्यात काय वाढून ठेवले ते समजत नाही; ते इतरांचे भविष्य काय सांगणार," असा प्रश्न निर्माण झाला. अशीच हालत आता  चाकणकरबाईंच्या "गुरुमाऊली"ची झालीय. तरीही त्या "ज्योतिष - भविष्य कथन हे थोतांड आहे," अशी कबुली देण्याची शक्यता नाही. कारण, पाच वर्षांपूर्वी (जानेवारी २०२१) ज्योतिष शास्त्राला शैक्षणिक प्रतिष्ठा देण्याचा निर्णय "मोदी सरकार"ने घेतलाय. त्यानुसार, 'केंद्र सरकार'च्या अखत्यारितील 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने (IGNOU- इग्नू)  ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' (MA) देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. त्यात ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांबाबतचं व्यावहारिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. ह्या निर्णयास, "ज्योतिषशास्त्र हे अवैज्ञानिक असल्याने हा अभ्यासक्रम रद्द करावा," अशी मागणी विज्ञान प्रचार-प्रसाराचं काम करणार्‍या संस्था- संघटनांनी केली.  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती"ने तेव्हा प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून म्हटले होते की, ''ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते ’छद्म विज्ञान’ आहे. ग्रह-तार्‍यांचा शास्त्रीय अभ्यास करणार्‍या विज्ञान शाखेला ’खगोलशास्त्र’ म्हणतात. त्या शास्त्राच्या उपलब्ध अभ्यासानुसार, आकाशातल्या ग्रह-तार्‍यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही; परिणाम होत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा दावा करणारा 'ज्योतिष' अभ्यासक्रम रद्द करावा!'' ही त्यांची मागणी योग्य आणि विज्ञान प्रसाराचा आग्रह धरणाऱ्या 'भारतीय संविधान'ला धरून होती. पण त्याची सरकारी पातळीवर दखल घेतली नाही. 


    अशाच प्रकारचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय २००१ मध्ये 'भाजप आघाडी' (NDA)च्या 'वाजपेयी सरकार'नेही घेतला होता. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने तो रद्द करण्यात आला. हा विरोध करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ खगोल वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर यांचाही समावेश होता. भारतीय वंशाचे ’नोबेल’ पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ व्ही.के.वेंकटरामन यांनी ज्योतिषशास्त्राची तुलना ’छद्म’ विज्ञानाशी (स्यूडोसायन्स) केलीय. 'छद्म' विज्ञान म्हणजे, विज्ञानासारखी मांडणी करून केलेली फसवणूक! ह्यात ज्योतिषशास्त्र ’क्रमांक एक’ वर आहे; आणि ते विविध प्रकारे जगभर आहे. ह्या सार्‍यांचा उद्योग आकाशातल्या ग्रह-तार्‍यांवर असतो. त्यातही भारतीय ज्योतिष्यांनी आपली उंची वाढवण्यासाठी त्याला "भटी शेंडी" लावल्याने आकाशात नसलेले ’राहू-केतू’ हे काल्पनिक ग्रह जन्मकुंडलीत आणले आहेत. ते ’कालसर्पयोग’ बनून (ज्याची जन्मकुंडली तयार केली आहे त्या-) जातकाला ’नारायण-नागबळी’ विधीसाठीचं ’गिर्‍हाईक’ बनवतात.


     याशिवाय, शनीची साडेसाती, २२ कोटी किलोमीटर दूरवर असलेल्या मंगळाची ’कडक’ बाधा, हातावरच्या गुरू-बुध-शुक्राचा दुबळेपणा दाखवणाऱ्या रेषा- चिन्हं- उंचवटे जाळ्या आहेत. शुभ-अशुभ दिवसाचे, मुहूर्ताचे खूळ आहे. वास्तुशास्त्र, ’नाडी’माहात्म्य, जपजाप्य- मंत्रमाहात्म्य यांचे उपाय-तोडगेही आहेत. ह्या साऱ्या बनावट उद्योगांसाठी ’मास्टर ऑफ आर्ट’ ज्योतिषी बनवून ’मोदी सरकार’ लोकांनी कष्टाने कमावलेल्या पैशांवर हात मारणारे खिसेकापू आणि दरोडेखोर तयार केलेत; तसेच स्त्रियांची अब्रू लुटणारेही तयार केलेत ; त्यांना प्रतिष्ठा दिलीय; हे अशोक खरातच्या प्रकरणावरून स्पष्ट होते.


     छत्रपती शिवरायांच्या आणि  राजमाता जिजाऊंच्या चरित्राची नटव्या-नाटकी शब्दांत विटंबना करणाऱ्या कथित 'शिवशाहीर' ब. मो. पुरंदरेंना 'महाराष्ट्रभूषण पुरस्कार' देऊन 'फडणवीस सरकार'ने त्याच्या नालायकीला 'सरकारमान्य' केले. तोच प्रकार 'मोदी सरकार'ने राष्ट्रीय विद्यापीठातून ज्योतिषशास्त्राचा 'मास्टर डिग्री'चा अभ्यास राबवून नकली विज्ञानाला 'सरकार मान्यता' देऊन केला आहे. २,००० कोटी रुपये खर्चून तयार केलेलं भारताचे चांद्रयान चंद्रावर पोहोचले नाही. "ते पोहोचणार नाही," असे भाकीत देशातील एकही ज्योतिषी करू शकला नाही. तिथे ’मोदी सरकार’ने तयार केलेले ’मास्टर्स’ ज्योतिषी लोकांच्या कुंडल्या मांडून, हस्तरेषा पाहून त्यांच्यावर आकाशातल्या ग्रह-तार्‍यांचा प्रभाव किती पडतो, ह्याचा काय डोंबलाचा अभ्यास करणार आणि त्यांचे भविष्य सांगणार?


       आई-वडील, पूर्वजांचे गुण-दोष अपत्यात उतरतात. तसे, "चंद्रसूर्यादि ग्रहांवरून येणार्‍या लहरींचे ठसे गर्भातून बाहेर येताना अर्भकाच्या मृदू शरीरावर उमटतात आणि त्याच्यात काही शारीरिक व बौद्धिक दोष जन्मत:च निर्माण करतात!" ह्या गृहीतकावर ज्योतिषशास्त्राचा डोलारा उभा आहे. परंतु, चंद्रसूर्यादी ग्रह-तार्‍यांच्या प्रकाश-लहरींचा कोणताही परिणाम अर्भकावर होत नाही, हे विज्ञानाने सिद्ध केलंय.  कारण सूर्याचा प्रकाश आपणापर्यंत आठ मिनिटांनंतर पोहोचतो. इतर ग्रह-तार्‍यांच्या प्रकाश-लहरी आपणापर्यंत पोहोचण्यास शेकडो वर्षं लागतात. अशा परिस्थितीत ग्रह-तार्‍यांचे प्रभाव-परिणाम मानवी जीवनावर कसे होणार? ते होत नाहीत, हे इयत्ता आठवीच्या पुस्तकात शिकवायचे आणि ’एमए’ला त्याच्या उलटे शिकवायचे, हा ’मोदी सरकार’ पुरस्कृत उफराटेपणा आहे. त्यासाठी ज्योतिषशास्त्राचा ’देशी बाणा’ दाखवला जातो; तोही खोटा आहे. कारण १२ राशी आणि जन्मकुंडलीतल्या १२ घरांत लोकांना ’गिर्‍हाईक’ बनवणारं ज्योतिषशास्त्र हे ’भारतीय’ नाही. १२ राशी ही 'ग्रीक कालगणना' पद्धत आहे. 'भारतीय कालगणना' ही २७ नक्षत्रांवर आधारित आहे.


       राशीला आलेल्या ग्रहांचा इष्ट-अनिष्ट परिणाम अनिवार्य किंवा अटळ असतो; असे ज्योतिषीही मान्य करीत नाही. तसा इतिहास नाही. तरीही भय, अज्ञान, अगतिकता यामुळे लोक ज्योतिष्यांचे 'गिर्‍हाईक' बनतात. अरिष्ट टाळण्यासाठी, ग्रहशांती करण्यासाठी तोडगे-विधी करतात. थोरले माधवराव पेशवे यांना क्षयरोगाने मृत्यूच्या दाढेत लोटले. त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी 'मृत्युंजय' मंत्राचा गजर अखंड चालू ठेवण्यासाठी शेकडो ब्राह्मण नियुक्त केले होते. तरीही, त्यांच्या मंत्रजागराला न जुमानता मृत्यूने माधवरावांना ओढून नेले!


     दुसरे महायुद्ध गाजवणारा जर्मनीचा ’हुकूमशहा’ हिटलर ह्याचा ज्योतिषावर नितांत विश्वास होता. त्याने आपल्या दिमतीला पाच प्रख्यात ’ज्योतिर्भास्कर’ बाळगले होते. त्यापैकी एकाला (त्याला स्वत:चेच भविष्य न समजल्यामुळे) इंग्लंडच्या हेरांनी पळवून नेले. उरलेले चौघे हिटलरला सल्ला देण्यास तत्पर होते. पण त्यांच्या सल्ल्याचा काडीमात्र उपयोग झाला नसल्याचे इतिहास सांगतो. आपला संपूर्ण पराभव होऊन शत्रूच्या हातात सापडण्याची नामुष्की टळावी, यासाठी हिटलरने स्वहस्ते स्वतःला भडाग्नी दिला. हा निर्घृण  प्रकार टाळण्यासाठी ग्रहांची अनुकूल स्थिती मिळवण्यात ज्योतिष्यांना यश लाभले नाही. चौघांपैकी एका ज्योतिष्याला तर हिटलरच्याच ’कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’मध्ये मृत्यू आला. हिटलरचा विश्वासू मित्र हिमलर याचाही ज्योतिषशास्त्रावर गाढ विश्वास होता. त्याने हिटलर जगतज्जेता व्हावा, यासाठी २४ ’मंत्र-तंत्रज्ञ’  ज्योतिष्यांवर चमत्कारिक सहाय्याचे काम सोपवले होते. त्यातील एका ज्योतिष्याने इटलीच्या नकाशावर 'सिद्धिलंबक' ठेवला असता; त्या लंबकाच्या डोलण्याने हिटलरच्या यशाची खात्री दिली होती. पण भविष्य उलटे फिरले! हिटलर दुसरे महायुद्ध हरला.


      राजर्षी शाहू महाराजांकडे भविष्यकथन करण्यासाठी एक नामवंत ज्योतिषी आला. शाहूराजांनी त्याला दोन दिवसांच्या कडक उपासाचा आणि चाबकाच्या फटक्यांचा पाहुणचार दिला. तो टाळण्यासाठी ज्योतिषी गयावया करू लागला. शाहूराजांनी त्याला सुनावलं, ''दोन दिवसांनी तुझ्यावर कोणतं संकट कोसळणार आहे, ते तुला ज्योतिषशास्त्राने समजत नाही. तू काय माझं भविष्य सांगणार? लोकांना फसवण्याचे हे धंदे बंद कर!'' ज्योतिषशास्त्राचा खोटेपणा शाहूराजांनी कृतीतून सप्रयोग उघडा पाडला. '१९६४ मध्ये तिसरे महायुद्ध होणार', '२००० मध्ये जगबुडी होणार', त्याआधी 'हिमालय वितळणार', अशी भविष्यकथनं नामवंत ज्योतिष्यांनी केली होती. ती खोटी ठरली. तसेच, 'गांधीजींची हत्या होणार', 'कॉम्प्युटरवरून कुंडल्या निघणार', 'टीव्हीवरून ज्योतिष सांगितले जाणार', 'जगाला लॉकडाऊन करणारी कोरोना- महामारी येणार,' याबाबत सावधानतेचा इशारा देणारं भविष्य जगातल्या एकाही ज्योतिष्याने कथन केलेलं नव्हतं. ह्या शास्त्रात "उडाला तर पक्षी आणि बुडाला तर बेडूक" ठरवणारी चलाखी आहे! 


     लग्नासाठी जन्मपत्रिकचे ३६ गुण जुळवण्याच्या बहकाव्यातून वर्ण्य-जाती व्यवस्थेची तुच्छता ज्योतिषशास्त्रातून पोसली जाते. उच्च जातीतल्या मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाचा आणि कनिष्ट जातीतील मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीचा गुण-जुळणीत एक-एक गुण कमी होतो. अशा जातिभेद घट्ट करणाऱ्या शास्त्राचं भविष्य हे त्याच्या इतिहासासारखेच खोटेच ठरणारे असणार! हे असंख्य पुराव्यांनिशी स्पष्ट झाले आहे.


     "आकाशातल्या आणि कुंडलीतल्या ग्रहांपेक्षा मनाचा निग्रह श्रेष्ठ असतो," अशी खात्री लोकांना देण्याची आज आत्यंतिक गरज असताना ’मोदी सरकार’ मात्र राष्ट्रीय विद्यापीठातून ’मास्टर्स ज्योतिषी’ तयार करीत आहे. त्याचं मार्केटिंग रुपाली चाकणकर यांच्यासारखे सत्ताधारी करीत आहेत, ही देशाच्या ’बौद्धिक महामारी’ची तयारी आहे. तिच्या समूळ उच्चाटनासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणे, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि 'लॉस'मुक्त आयुष्य जगा ! बहिणाबाई चौधरी यांची "ज्योतिषा"वरची कविता वाया घालवू नका! 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages