शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांचे पुन्हा एकदा डोके वर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांचे पुन्हा एकदा डोके वर

 शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांचे पुन्हा एकदा डोके वर



मोहोळ (कटूसत्य वृत्त) :– शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र समोर येत असून, स्थानिक प्रशासन आणि गुन्हे शाखेच्या निष्क्रियतेमुळे बेकायदेशीर व्यवसायांना जणू मोकळे रान मिळाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
शहरातील मुख्य मार्गावर उघडपणे दारू विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या प्रकारामुळे कायद्याचा धाक उरला आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. विशेषतः शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातही अशा प्रकारे खुलेआम दारू विक्री होत असल्याने पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, कुरुल रोड परिसरात मटका जुगार मोठ्या प्रमाणावर बिनबोभाट सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होत असून, स्थानिक पातळीवर काही मंडळींना याचा आश्रय असल्याचीही चर्चा आहे. पोलिस प्रशासनाला या प्रकाराची माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कथित निद्रिस्त अवस्थेमुळे थेट कारवाईची प्रथा जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे. पूर्वी अचानक छापे टाकून अवैध धंद्यांवर लगाम घालणारी यंत्रणा आता निष्क्रिय झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री, मटका, तसेच इतर बेकायदेशीर व्यवहार पुन्हा फोफावू लागले आहेत.
यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुण पिढी या अवैध व्यवसायांच्या विळख्यात अडकत असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मोहोळ शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages