संत बाळूमामा उत्सवानिमित्त बेलाटी येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
बेलाटी (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील विजापूर बायपास रोडजवळ असलेल्या श्री संत बाळूमामा मंदिरात संत बाळूमामा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने ९ ते २० मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्सवाबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आदमापूरप्रमाणेच बेलाटी येथे संत बाळूमामा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. सोमवार, ९ मार्च रोजी मंदिरात वात घालणे, वीणापूजन तसेच रंगपंचमी व एकनाथ षष्टी कार्यक्रमाने उत्सवाची सुरुवात झाली. सोमवार, १६ मार्च रोजी उत्सवाची सांगता होऊन उपवास सोडण्याचा कार्यक्रम होणार आहे.
९ ते १६ मार्च या कालावधीत मंदिरात दररोज कीर्तन, भजन, महाआरती व महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १५ मार्च रोजी संत बाळूमामा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
बुधवार, १८ मार्च रोजी अमावास्यानिमित्त सकाळी ६ वाजता संत बाळूमामांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ७ वाजता महाआरती व महाप्रसाद होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत दिवसभर धनगरी ओव्या, भजन व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता महाआरती होईल.
तसेच गुरुवार, १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शुक्रवार, २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन संत बाळूमामा मंदिरात साजरा करण्यात येणार असून दुपारी १२.३० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अधिष्ठानाजवळ गुलालाचे कीर्तन होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांमध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी सहभागी होऊन कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष पाटील-बेलाटीकर यांनी केले आहे.
यावेळी राम हणमंत पाटील, श्रीकांत श्रीराम पाटील, विजय श्रीराम पाटील, जयजयराम श्रीकांत पाटील, बाल कीर्तनकार गुंड महाराज आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment