Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात 'स्वीकृत'वरून प्रचंड गोंधळ

 सोलापूरात 'स्वीकृत'वरून प्रचंड गोंधळ

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर






- - नाव कट झालेल्या भाजप इच्छुकाचा आत्महत्येचा इशारा, अमोल शिंदेंना मेसेज

- 25 लाख देऊन राष्ट्रवादी नगरसेवकाला फोडले

- स्वीकृत नगरसेवक निवडीविरोधात  विरोधक कोर्टात जाणार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या यादीवरून प्रचंड गोंधळ झाला. भारतीय जनता पक्षाकडून नऊपैकी आठच नावे जाहीर केल्याने त्यावर शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने आक्षेप घेत महापौरांच्या आसनासमोर गोंधळ घातला.

या गोंधळातच पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची वेळ भाजपवर आली.

दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छूक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या एका इच्छुकाने मला मेसेज केला आहे. त्याने बालाजी सरोवर येथे असलेल्या काही नेत्यांची, काही आमदाराचं नाव लिहून आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे, अशी धक्कादायक माहिती शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी सभागृहात दिली, त्यामुळे पहिल्याच सभेत मोठी खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाने नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत १०२ जागांपैकी ८७ जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या भाजपच्या वाट्याला नऊ जागा आल्या होत्या. या नऊ जागांवर भाजपने नावे घोषित करणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने केवळ आठ नावांची घोषणा करून कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला.

त्यावर शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी आक्षेप घेतला. भाजपने 9 पैकी 9 नावे आजच घोषित करावी, अशी मागणी अमोल शिंदे आणि काँग्रेसचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली. मात्र, भाजपकडून पुढच्या सभेत नाव घेणार, अशी भूमिका घेतली आहे. याच मुद्यावरून काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महापौरांच्या व्यासपीठाकडे धावून गेले.

महापौर विनायक कोंड्याल हे सभेचे कामकाज करत असताना अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी महापौरांच्या व्यासपीठावर हात आदळत आक्रमक भूमिका मांडली. विरोधकांचा गोंधळ पाहून महापौर विनायक कोंड्याल सभा तहकूब करत कामकाज स्थगित केले. त्यामुळेही विरोधकांनी तीव्र नापासंती व्यक्त केली.

शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे म्हणाले, भाजपचे लोक सभागृह चालवू शकत नाहीत. सभागृह नेते नरेंद्र काळे हे तर शिस्तीचे धडे सांगतात. स्वीकृत नगरसेवकपदासाठी ज्यांनी भारतीय जनता पक्षाचा अर्ज भरला आहे, त्या इच्छुकाचा मला मेसेज आला आहे. आज बालाजी सरोवरमध्ये असलेल्या काही नेत्यांचं आणि आमदारांचं नाव लिहून आत्महत्या करणार आहे, असा मेसेज मला आला आहे, तो मी सभागृहात सांगितलेला आहे. सभागृहात तुम्ही नाव कट केले आहे, ते कोणाचे नाव आहे, अशी मी विचारणा केली. हे कळाल्यानंतर भाजपचे महापौर आणि इतरांवर पळ काढायची वेळ आली आहे. ह्याच्या कार्यकर्त्याला आत्मह्या करतो म्हटल्यानंतर पळून गेलेले आहेत.

भाजपमध्ये कोण पक्ष वाढवत आहे, कोणी पक्षाला मोठं केलं आहे आणि आज मलई कोण खातंय, हे सगळ्यांना माहिती आहे. मी आज ते नाव जाहीर करू शकतो. ते दररोज तुम्हालाही भेटतात. त्यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे, असेही शिवसेनेचे नगरसेवक शिंदे यांनी नमूद केले आहे.

सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल ८७ जागा जिंकल्या आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी गेल्यानेत त्यांच्या सभागृहात महापालिकेत दहा जागा स्वीकृत नगरसेवक म्हणून भरता येणार होत्या. त्या १० जागांसाठी भाजप आणि एमआयएम पक्षाकडून तब्बल ६२ अर्ज आले होते.

भाजपच्या वाट्याला नऊ, तर एमआयएमला संख्याबळाच्या आधारे एक जागा मिळणार होती. त्यानुसार आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दहा जणांची नावे जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ नऊजणांची नावे या सभेत जाहीर झाली. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सर्वच नावे जाहीर करण्याच्या मागणीवरून गोंधळ घातला, त्यामुळे भाजपला कामकाज तहकूब करावे लागले.

एमआयएमकडून नय्यूम सालारांना संधी

एमआयएमकडून नय्यूम सालार यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यांना एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी निवडणुकीच्या काळातच शब्द दिला होता, त्यानुसार एमआयएमकडून सालार यांची नियुक्ती स्वीकृत नगरसेवकपदी करण्यात आली आहे.

महापौर विनायक कोंड्याल यांनी सभागृह तहकूब केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अमोल शिंदे यांनी भाजपवर मोठा आरोप केला. भाजपने चालबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला २५ लाख रुपये देऊन आपल्या बाजूला वळविले, असा गंभीर आरोप केला आहे.

शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने कालच चालबाजी करून वैभव हत्तुरे यांना २५ लाख रुपये देऊन त्यांची नगरसेवकांची संख्या ८८ वर नेली, त्यामुळे भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकाच्या नऊ जागा आल्या. मात्र, भाजपने त्या सर्व नऊ जागा जाहीर करण्याऐवजी केवळ सातच नावं जाहीर केली आहेत, असा दावाही शिंदे यांनी केला.

सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपचे (BJP) ८७ नगरसेवक आहेत. त्यांना वाटत होतं की आपल्याला सातच जागा मिळतील, पण नगरसेवक वैभव हत्तुरे यांना २५ लाख रुपये देऊन त्यांचा पाठिंबा घेतला. वास्तविक ते भाजप उमेदवाराच्या विरोधात लढले, त्या ठिकाणी भाजप उमेदवाराचा पराभव करून ते निवडून आले आहेत. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी त्यांना गाडीत घेऊन गेले. आमदारांपाशी बसवले. त्या ठिकाणी पैशाची थैली मिळाल्यावरच मग ते त्यांच्यासोबत गेले. ठीक आहे, कोणी कुठे जायचे याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले आहे.
ते म्हणाले, सोलापूर शहराचे प्रश्न मांडायला आम्हाला जनतेने महापालिकेत पाठविले आहे, त्या भूमिकेवर आम्ही ठाम राहू. आम्ही कोणत्याही सदस्याला सोबत आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. आम्ही निवडणुकीत जरी राष्ट्रवादीसोबत एकत्र असलो तरी आमच्या चार सदस्यांवर आम्हाला स्वीकृत मिळत नव्हतं, हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे आम्ही कोणालाही सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.
नगरसेवक शिंदे म्हणाले, आमच्या म्हणण्यानुसार सातच नावं अंतिम आहेत. आठवं आणि नववं नाव जेव्हा येईल, तेव्हा आम्ही कोर्टात जाऊ. आज जी नावं वाचली आहे, तीच नावं फायनल असतील. परिवहन समितीची नावे त्यांना जाहीर करता आली नाहीत, असाही दावा शिंदे यांनी केला आहे.

चौकट-
भारतीय जनता पक्षाकडून शहराध्यक्ष रोहिणी तडळवकर, रुद्रेक्ष बोरामणी, ज्ञानेश्वर म्याकल, श्रीनिवास दायमा, अक्षय अंजिखाने ह्यांना भाजप आणि संघ परिवारातील निष्ठावंतांना संधी देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून पक्षासोबत असलेल्या वृषाली चालुक्य आणि मोची समाजातील ऋषिकेश म्हेत्रे, तसेच माध्यम प्रतिनिधी म्हणून मनीष केत यांनाही भाजपनेही स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments