उमराणी बंधाऱ्यात पाणी अडवल्याने भीमा नदी कोरडी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

उमराणी बंधाऱ्यात पाणी अडवल्याने भीमा नदी कोरडी

 उमराणी बंधाऱ्यात पाणी अडवल्याने भीमा नदी कोरडी


 दक्षिण सोलापूरमध्ये शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर 




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दरवर्षीप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी उजनी धरण येथून भीमा नदी पात्रात पाणी सोडले जाते. मात्र चालू वर्षी वेळेत पाणी न सोडल्यामुळे मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास उभे पीक जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी संपर्क साधून आपली समस्या मांडली होती. त्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अधीक्षक अभियंता, लघुक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा), सोलापूर यांना निवेदन देत उजनीतून सोडलेले पाणी टेलएंडपर्यंत पोहोचवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

या मागणीनुसार उजनीतून पाणी सोडण्यात आले. मात्र कर्नाटक सरकारने उमराणी बंधारा याची उंची वाढवल्यामुळे उजनीतून सोडलेले पाणी तेथेच अडविले गेले आणि सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी पूर्णतः कोरडी पडली. याचा गंभीर परिणाम दक्षिण सोलापूर तालुक्यावर झाला असून लवंगी, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर आदी गावांपर्यंत उजनीचे पाणी पोहोचले नाही. तसेच मंद्रूपसह एकूण आठ गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही बंद झाला.

या परिस्थितीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेती संकटात सापडली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. पाण्याअभावी शेतकरी व नागरिक मोठ्या अडचणीत सापडले असून, अनेक ग्रामस्थांनी ही बाब पुन्हा खासदार प्रणिती शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी मोबाईलद्वारे तातडीने संपर्क साधून हस्तक्षेप केला. प्रशासनाने कर्नाटकातील संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधल्यानंतर उमराणी बंधाऱ्यात अडविलेले पाणी सोडण्यात आले असून, भीमा नदीत पुन्हा प्रवाह सुरू झाला आहे.
पाणी सोडण्यात आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, टेलएंडपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून पुढील नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages