शिवजन्मोत्सवात आरती की विचारपूजन? शिवरायांच्या ‘दैवतीकरणा’वरून नवी चर्चा
पुणे/मुंबई (कटूसत्य वृत्त) :- शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर पंचारती, कापूर-अगरबत्ती लावून पारंपरिक आरती करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, या प्रथेमुळे शिवरायांचे ‘दैवतीकरण’ होऊन त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास झाकोळला जाईल, अशी तीव्र भूमिका काही सामाजिक कार्यकर्ते, इतिहासप्रेमी आणि विचारवंतांनी मांडली आहे. “शिवराय हे देव नव्हेत; ते स्वकर्तृत्वावर उभे राहिलेले महामानव आहेत,” असे ठाम मत या गटाने व्यक्त केले आहे.
“चमत्कार नव्हे, कर्तृत्वाचे स्मरण व्हावे”
सामाजिक कार्यकर्ते, इतिहासप्रेमी आणि विचारवंतांचे म्हणणे आहे की, आरती-पूजनाच्या वाढत्या प्रथेने भविष्यातील पिढ्यांपुढे शिवरायांची प्रतिमा ‘चमत्कारिक देव’ म्हणून उभी राहण्याचा धोका आहे. “एकदा दैवतीकरण झाले की, शिवरायांचा समग्र पराक्रम हा चमत्कारातून घडला, असे भोंदू प्रवृत्तीचे लोक सांगू लागतील. त्यामुळे त्यांच्या लढ्याची ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी दुर्लक्षित राहील,” असा इशारा त्यांनी दिला.
काही वर्षांपूर्वी एका चित्रकाराने शिवरायांचे अनेक हात असलेले चित्र रेखाटून त्यांना देवतासदृश दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्या चित्राचे काही राजकीय नेत्यांनी कौतुक केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. “अशा कृतींचा उद्देश काय?” असा सवाल उपस्थित करत, शिवरायांना अलौकिक रूप देण्याऐवजी त्यांच्या विचारांचा आणि प्रशासनकौशल्याचा अभ्यास व्हावा, अशी मागणी होत आहे.
“महामानवांची परंपरा जपली पाहिजे”
इतिहास अभ्यासकांच्या मते, शिवरायांनी मन, बुद्धी आणि मनगटाच्या बळावर स्वराज्य उभे केले. प्रतिकूल परिस्थितीत लढत, संघटनशक्ती, दूरदृष्टी आणि प्रशासनकौशल्याच्या जोरावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली. “दैवतीकरण केल्यास त्यांच्या मानवी संघर्षाची जाणीव कमी होते. शिवरायांचे मोठेपण त्यांच्या मानवी कर्तृत्वात आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.
याच संदर्भात प्रबोधनकार ठाकरे यांचे वचनही चर्चेत आले आहे. त्यांच्या भाषेत, “३३ कोटी देवांची फलटणही शिवरायांच्या नावासमोर फिकी पडते,” असे म्हणत, शिवरायांचे महत्त्व दैवी नव्हे तर ऐतिहासिक आणि मानवतावादी संदर्भात अधोरेखित केले गेले आहे.
पर्याय म्हणून ‘जिजाऊ वंदना’ची मागणी
आरतीऐवजी ‘जिजाऊ वंदना’ म्हणावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. राजमाता जिजाबाई यांच्या संस्कारांमुळेच शिवरायांचे व्यक्तिमत्त्व घडले, असे सांगत मातृशक्तीचे स्मरण आणि विचारांचे पूजन करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. “भावनेच्या भरात पूजा-अर्चा करण्याऐवजी इतिहासाचे भान जपणे अधिक आवश्यक आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.
समाजात दोन प्रवाह
या मुद्द्यावर समाजात दोन प्रवाह दिसून येत आहेत. एकीकडे आरती ही श्रद्धेची अभिव्यक्ती असून त्यात गैर काही नाही, असे मत व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे, सार्वजनिक कार्यक्रमांतून दैवतीकरणाला प्रोत्साहन देणे योग्य नाही, असा युक्तिवाद केला जात आहे.
शिवजन्मोत्सव हा केवळ उत्सव नसून तो इतिहासाची जाणीव आणि स्वराज्याच्या मूल्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. भविष्यातील पिढीसमोर आपण “चमत्कारिक देव” नव्हे, तर जागतिक कीर्तीचे, महापराक्रमी आणि दूरदर्शी महापुरुष म्हणून शिवरायांची प्रतिमा उभी करावी, अशी अपेक्षा या चर्चेतून व्यक्त होत आहे.
“जय जिजाऊ, जय शिवराय” या घोषणेसह इतिहासाचे भान जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments