Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या 'बोलक्या'

पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या 'बोलक्या'



भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा!

पुणे (कटूसत्य वृत्त):- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या 'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६' या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महानगरातील भिंती अक्षरशः बोलू लागल्या आहेत. शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये खेळाप्रती उत्साह निर्माण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ठिकठिकाणी आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात आली आहेत. यामुळे रस्ते केवळ रहदारीचे मार्ग न राहता, ते आता एक मुक्त कलादालन वाटू लागले आहेत.
   
जागतिक दर्जाच्या खेळाडूंची ओळख
या भित्तिचित्रांमध्ये केवळ सायकलिंगच नव्हे, तर विविध खेळांतील दिग्गज आणि उगवत्या ताऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने २०२० चा रोड वर्ल्ड चॅम्पियनचा असलेला इटलीचा एलिसा बालसामो याचे चित्र क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणारे पहिले भारतीय रोड सायकलपटू अरविंद पवार  यांचे चित्र आजच्या तरुणाईसाठी प्रेरक आहे.
२०२५ च्या ट्रॅक आशिया कपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या हर्षिता जाखड यांचे चित्र 'वुमन पॉवर'चा संदेश देणारे आहे. सायकलिंगच्या क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अल्ट्रा-सायकलपटू कबीर यांच्या संघर्षाची गाथा भिंतीवर रेखाटली आहे.
   
खेळ आणि संस्कृतीचा सुरेख संगम
केवळ खेळाडूच नव्हे, तर महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आणि संस्कृतीचे दर्शनही या भिंतींवर घडते. एका बाजूला 'वारी' आणि पारंपारिक वेशभूषेतील स्त्री-पुरुषांची चित्रे आहेत, तर दुसऱ्या बाजूला बास्केटबॉल, वेटलिफ्टिंग, योग आणि टेनिस खेळणाऱ्या महिलांची चित्रे 'Women of Pune' या संकल्पनेखाली साकारण्यात आली आहेत. 'भारतातील पहिली जागतिक सायकलिंग स्पर्धा' असा उल्लेख असलेली ही चित्रे पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेण्यासाठी सज्ज झाली आहेत.

 प्रशासनाचा पुढाकार आणि नागरिकांचा प्रतिसाद
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका माध्यमातून शहराच्या सौंदर्यीकरणाचा हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. सिमेंटच्या निर्जीव भिंतींवरील रंग, कला आणि संस्कृतीचा हा सुंदर संगम पाहून नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. सायकल चालवणाऱ्या आणि व्यायाम करणाऱ्या नागरिकांसाठी यामुळे उत्साहवर्धक वातावरण तयार झाले आहे.

"शहरातील भिंतींवर आपले खेळाडू आणि आपली संस्कृती पाहताना अभिमान वाटतो. यामुळे केवळ शहराचे रूपच पालटले नाही, तर खेळाबद्दलची जागृतीही वाढली आहे," अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.  'बजाज पुणे ग्रँड टूर' च्या निमित्ताने झालेला हा कलेचा आविष्कार पुणेकरांसाठी एक मोठी पर्वणी ठरत असून या कलेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये क्रीडा उत्सवासाठी योग्य वातावरण निर्मिती झाली आहे..



Reactions

Post a Comment

0 Comments