Hot Posts

6/recent/ticker-posts

रणजितसिंह शिंदेंच्या सक्रिय प्रचाराने भाजपला मिळाली नवी ताकद

 रणजितसिंह शिंदेंच्या सक्रिय प्रचाराने भाजपला मिळाली नवी ताकद

मानेगावात पृथ्वीराज सावंत यांच्या प्रचारार्थ गावभेट संवादावर भर






माढा (कटूसत्य वृत्त):- मानेगाव जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रचार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, या प्रचारात भाजपकडून उमेदवार पृथ्वीराज सावंत यांच्या समर्थनार्थ नेते रणजितसिंह शिंदे आक्रमक भूमिकेत दिसून येत आहेत. गावोगावी भेटी, थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडत रणजितसिंह शिंदे यांनी प्रचाराला वेगळीच धार दिली आहे. कार्यकर्ते आणि मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी भाजपची भूमिका प्रभावीपणे मांडल्याचे चित्र सध्या मानेगाव गटात पाहायला मिळत आहे.

रणजितसिंह शिंदे यांनी आपल्या प्रचार दौऱ्यादरम्यान विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर भर दिला. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मुद्द्यांवर भाजपची ठोस भूमिका मतदारांसमोर मांडत, “जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा उमेदवार आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. पृथ्वीराज सावंत हे स्थानिक पातळीवर जनतेशी जोडलेले, काम करणारे आणि विश्वासार्ह उमेदवार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रचारादरम्यान मानेगाव गटात भाजपच्या विरोधात उभे असलेले सुहास पाटील जामगावकर यांच्याबाबतही रणजितसिंह शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “एकेकाळी सहकारी असले तरी सध्या ते विरोधी भूमिकेत आहेत. त्यांचा भाजपशी किंवा आमच्याशी कोणताही संबंध नाही,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले. यामुळे मतदारांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये, हा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रणजितसिंह शिंदे यांनी स्पष्ट केले की, “भाजपचा एकमेव आणि अधिकृत उमेदवार पृथ्वीराज सावंत हेच आहेत. मानेगाव गटाच्या विकासासाठी त्यांनाच भरघोस मतांनी निवडून देणे आवश्यक आहे.” त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे दिसून येत आहे.

गावभेटी, छोट्या सभा आणि थेट संवाद यामुळे प्रचारात रंगत आली असून, मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे. रणजितसिंह शिंदे यांच्या सक्रिय सहभागामुळे भाजपचा प्रचार अधिक प्रभावी होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. येत्या निवडणुकीत मानेगाव गटात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, प्रचाराच्या या निर्णायक टप्प्यात भाजपने आपली ताकद पणाला लावल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments