शिवसेनेची रणनीती ठरवणारी बैठक संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना सोलापूर शहर-जिल्ह्याच्या वतीने शिवसेना पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. ही बैठक माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची भूमिका, संघटनात्मक बळकटी, प्रभागनिहाय तयारी, स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधा, विकासकामे तसेच प्रचार रणनीती यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिवसेना ही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारी पक्षसंस्था असून, आगामी निवडणुकीत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम व जनतेशी नाळ जुळलेले उमेदवार देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मार्गदर्शन करताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी कार्यकर्त्यांना संघटनेत एकजूट ठेवून, जनतेशी थेट संवाद साधत विकासाचा विश्वास निर्माण करण्याचे आवाहन केले. माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी स्थानिक प्रश्नांची अचूक ओळख करून त्यावर ठोस उपाययोजना मांडण्याची गरज अधोरेखित केली. ज्येष्ठ नेते साईनाथजी अभंगराव यांनी शिवसेनेच्या विचारधारेनुसार प्रामाणिक व लोकाभिमुख राजकारण करण्याचा सल्ला दिला.
या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, जिल्हाप्रमुख अमरदादा पाटील, शहरप्रमुख सचिन भाऊ चव्हाण, मनीषजी काळजे, युवानेते श्रीनिवासजी संगा, अल्पसंख्याक शहरप्रमुख दादा शेख, युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द, कर्मचारी सेना संपर्कप्रमुख प्रकाशा अवस्थी यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी आगामी निवडणूक ताकदीने लढवून सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी एकमुखाने व्यक्त केला.
.png)
0 Comments