आदर्श माता
राजमाता जिजाऊ
हजारो वर्षाची गुलामगिरी, स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा घालून माता-भगिणींची अब्रू सुरक्षित राखण्यासाठी, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, श्रमकरी जनतेला हक्काचं, न्यायाचं विचारपीठ उभं केलं. अठरा पगड जातीच्या लोकांना बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदारांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचे रणशिंग स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या साथीने फुंकले, आणि आपल्या मनातील स्वराज्याचा मानस शिवरायांच्या कार्य आणि कर्तृत्वातून उभा केला. रायगडावर बत्तीस मन सोन्याचं सिंहासन उभं करून जातिवाद्यांना, धर्माच्या ठेकेदारांना नमवून आपल्या वीरपुत्राला छत्रपती बनवून ज्यांनी आपली कारकीर्द इतिहासात नोंदवून ठेवली, आणि इतिहासाने ज्यांच्या कार्य कर्तृत्वाचा ठसा सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवला अशा मानवतेचे राज्य उभं करणाऱ्या जगातील आदर्श माता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त हा लेख..
निजामशाहीचे मातब्बर सरदार लखोजीराव जाधव आणि म्हाळसाराणी यांच्या पोटी जन्म 12 जानेवारी 1598 सिंदखेडराजा याठिकाणी.
पराक्रमाची परंपरा लाभलेल्या घराण्यात जिजाऊ वाढू लागल्या. अवघे 8 -10 वर्षे वय असताना त्यांना घोडेस्वारी तलवारबाजी यांसारखे शिक्षण देण्यासाठी लखोजीरावांनी गोमाजी नावाचा विश्वासू सेवक नेमला होता. म्हाळसाराणींनी जिजाऊंच्या जडणघडनिकडे सुरुवातीपासूनच लक्ष दिले होते.त्यांच्या व्यक्तिमत्वात कोणतीच उणीव राहू नये याबाबत त्या दक्ष होत्या. राजघराण्यातील स्त्रियांना विविध भाषेचे ज्ञान असावे या हेतूने जिजाऊंना कानडी, उर्दू, फारशी, हिंदी तसेच संस्कृतचेही धडे दिले होते.
पराक्रमी, सुसंस्कृत, मर्यादशील असणाऱ्या शहाजीराजांशी जिजाऊंचा विवाह झाला आणि तडफदार,दुरदृष्ठी असणाऱ्या जिजाऊंनी भोसले घराण्यात प्रवेश केला....
ज्या काळात मराठी मातीमध्ये मनुवाद्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित करून सर्वसामान्य जनतेला पारतंत्र्य आणि गुलामीत ठेवलं होतं. अस्मानी आणि सुलतानीला तोंड देता देता रयत बेजार झाली होती. या पिचलेल्या रयतेला जिजाऊंनी विश्वास देऊन उभं केलं आणि शिवरायांद्वारे स्वराज्य उभारणीचा पाया घातला.
शिवाजी महाराजांसारखा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, याच भारतभूमीला मुक्त करण्यासाठी एक महान युगपुरुष त्यांनी घडवला हीच त्यांची सर्वात मोठी कर्तबगारी होय. विरकन्या, विरपत्नी व वीरमाता अशा तीनही भूमिका पार पडण्याचे भाग्य जगातील सर्वच महिलांना लाभले नाही. पण जीजाऊंनी या भूमिका अगदी चोखपणे बजावल्या.
जगातील सर्वच माणसे संस्काराने कर्तृत्ववान बनतात त्यांच्यावरचा पहिला संस्कार त्यांची माता करते हे आपण जाणतोच. अगदी तशाच पद्धतीने शिवरायांची जडणघडण, शिवरायांचे कर्तृत्व, त्यांचा बाणेदारपणा, बुद्धिचातुर्य, स्वाभिमान, साहसी वृत्ती, परस्रीला आई - बहिणीची उपमा देण्याचे संस्कार जिजाऊंनी कशा प्रकारे केले असतील ? यावरून जिजाऊंचे विचार किती उच्च असतील याची कल्पना येते.
जिजामाता केवळ शहाजीराजांच्या कर्तबगरीने मोठ्या झालेल्या नव्हत्या तर त्यांच्यात स्वतंत्र बुद्धी, स्वतंत्र कर्तबगारी होती. त्या सर्वसामान्य विचारांच्या नव्हत्या, त्यांचे विचार दुरदृष्ठीचे, क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी होते. त्यांच्या विचारात अन्यायाप्रति चीड आणि युगप्रवर्तनाचं सामर्थ्य दडलेलं होतं.
शिवराय लहान असताना पुणे जहांगिरीची चोख व्यवस्था त्यांनी राखली होती. त्यांच्या या कर्तबगरीचा व गुणांचा गौरव करताना शहाजीराज्यांच्या पदरी असणारा जयराम पिंडे नावाचा कवी म्हणतो...
*जशी चंपकेशी फुले फुलजाई*।
*भली शोभली त्यास जाया जिजाई*।।
*जिचे कीर्तीचा चंबू जंबुद्वीपाला*।
*करी साऊली माउली मुलाला*।।
या ओळीतून जिजाऊ किती तोलामोलाच्या होत्या, त्यांचे व्यक्तिमत्व किती उच्च प्रतीचे होते हे लक्षात येते.
जिजाऊंचे चरित्र पहिले तर त्यांच्याइतक्या यातना, कष्ट, त्याग, दुःख जगाच्या इतिहासात अन्य कोणत्या स्त्रीने सोसल्या असतील असे वाटत नाही. स्वराज्यासाठी जिजाऊंना फार मोठी किंमत मोजावी लागली होती.
आपल्या पित्यासह माहेरची रक्ताची माणसं निजामशहाच्या दरबारात कापली गेल्याची वार्ता ज्यावेळी जिजाऊंना समजली असेल त्यावेळी त्यांच्यावर दुःखाचा केवढा मोठा डोंगर कोसळला असेल ?आपले जेष्ठ पुत्र संभाजी राजे लढाई लढत असताना शत्रुसैन्याकडून मारले गेल्याची खबर मिळाली तेंव्हा त्यांच्या हृदयाची स्थिती काय झाली असेल ?
शहाजी राजांनी आदिलशाहीचे राज्य कर्नाटकात वाढवण्यासाठी आपली तलवार गाजवली त्याच रणमर्दाला शहाच्या हुकमानुसारच विश्वासघाताने कैद केल्याचे समजले तेंव्हा त्यांच्या मनात किती मोठा संताप, प्रचंड दुःख आणि उद्वेग यांचा कोलाहल माजला असेल ?
दिल्लीपती औरंगजेब बादशहाने त्यांच्या पुत्रास आग्रा येथे सन्मानाने पाचारण करून बोलावले व बंदिवासात टाकल्याचे पाहून त्यांना काय यातना झाल्या असतील ?
मात्र या दुःखाने जिजाऊ अजिबात खचून गेल्या नाहीत,उलट त्यांनी एक खूणगाठ मनाशी बांधली ती अशी की या सर्व सत्ताधीशांच्या सत्तेची फळे कडूच आहेत आणि ही कडू फळे आपल्या भावी पिड्यांच्या नशिबी यायला नकोत असं वाटत असेल तर त्यावर एकच उपाय तो म्हणजे स्वराज्याची स्थापना. हाच नव्या युगाचा मंत्र त्यांनी आपल्या पुत्रास शिवरायांस दिला आणि याच दिव्य मंत्राने शिवरायांनी आपल्या आऊसाहेबांचे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं. शिवरायांसारखा महापुरुष घडवत असताना जिजाऊंची भूमिका केवळ मातेची नव्हती तर त्या शिवरायांच्या पहिल्या गुरू आणि खऱ्या मार्गदर्शक होत्या. लोककल्याणासाठी त्यांनी अनेकदा आपल्या पुत्राला मृत्यूच्या खाईत ढकललं.
पुण्यातील शापित जमीन लागवडीखाली आणून दहशत पसरविणाऱ्यांना शह दिला.
शहाजीराजांच्या मृत्यूनंतर खचून न जाता त्यांचं अर्धवट राहिलेलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सती न जाता त्या पुन्हा नव्या जोमाने आणि जिद्दीने उभ्या राहिल्या आणि सतीची प्रथा बंद केली. सतीची प्रथा बंद करण्याचा सर्वात पहिला मान मिळतो तो म्हाळसारानी आणि जिजाऊंना.
15 ऑगस्ट 1666 रोजी शिवाजी महाराज आग्रा येथून निसटले तेंव्हा जिजाऊंनी रांगणा किल्ला स्वतः जिंकून शिवरायांना भेट दिला होता.
याचा आजच्या प्रत्येक आईने आदर्श घ्यावा. जोपर्यँत या महाराष्ट्रात जिजाऊंसारखी चतुर भल्या भल्या शुरविरांना लाजवेल अशी रणनीती वापरणारी महिला जन्माला येत नाही तोपर्यँत शिवरयांसारखा महापुरुष जन्माला येणं शक्य नाही...
आपल्या स्वराज्य उभारणीसाठी 12 मावळातील लोक एकत्र करून स्वराज्याचा पाया भक्कम केला.
दक्षिणेत मराठ्यांचे स्वातंत्र्य व सार्वभौम राज्य स्थापन केलं. हे राज्य कोण्या एका धर्माचं, पंथाचं, कोण्या एका जातीचं नव्हतं तर ते बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांचं राज्य होतं.
*हे राज्य अवघ्यांचे सर्व जातीपातींनी ते रक्षावे*
या वाक्यास साजेसा इतिहास या मातीत घडला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात आरमार उभे करून, महाराष्ट्राच्या कड्याकपारीत गडकिल्ले बांधून, राज्यभिषेक करवून घेतला आणि स्वतःस छत्रपती म्हणून घोषित करून अखंड महाराष्ट्राचा इतिहास बदलून टाकला. आणि या सर्व घटनांच्या जिजाऊ स्वतः साक्षीदार बनल्या.
जगातील मान्यवरांनी ज्यांच्या कार्याची, कर्तृत्वाची दखल घेऊन दुर्गम आणि बेलाग असणाऱ्या रायगडावर राज्याभिषेकास हजर राहून त्यांच्या कार्याला आणि कर्तुत्वाला मुजरा केला अशा महाराष्ट्राच्या मातीतील आगळ्या वेगळ्या, देखण्या सोहळ्याच्या साक्षीदार झालेल्या राजमाता जिंजाऊंनी समाधानाने आपला देह रायगडाच्या पायथ्याला आपल्या राहत्या वाड्यात पाचाड येथे ठेवला आणि या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला गुलामगिरीची बंधने तोडायला शिकवून स्वातंत्र्यासाठी प्रेरित व्हायला शिकवले...
जिजाऊ साहेब देहाने जरी आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेला एकेक मावळा, एकेक रणरागिणी महाराष्ट्रात क्रांतीची मशाल हातात घेऊन जिजाऊंचा वारसा सन्मानाने जपताना दिसत आहे.
अशा या आदर्श मातेला क्रांतीकारी विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.
रंजना शिवाजी पाटील,
जिजाऊ ब्रिगेड, कोल्हापूर.
सौजन्य :- फेसबुक
.png)
0 Comments