पनगराध्यक्षपदी नितीन विठ्ठल इंगोले, नामनिर्देशित सदस्यपदी विजय व तनुजा यांची निवड
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी शिवसेना पक्षाचे नितीन विठ्ठल इंगोले यांची बिनविरोध निवड झाली, तर नामनिर्देशित सदस्यपदी विजय वसंत इंगोले आणि तनुजा बाळासाहेब एरंडे यांची निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.
दि. १३ जानेवारी रोजी सांगोला नगरपरिषद उपाध्यक्षपदी निवड व नामनिर्देशित सदस्यांचे नामनिर्देशन यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी आनंदाभाऊ माने यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात संपन्न झाली.
उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षाकडून नितीन विठ्ठल इंगोले यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. पिठासीन अधिकारी व नगराध्यक्षांनी सदर नामनिर्देशनपत्र वैध असल्याचे जाहीर केले. केवळ एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यामुळे नितीन विठ्ठल इंगोले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
त्याचप्रमाणे नामनिर्देशित सदस्यपदासाठी मान्यताप्राप्त पक्ष व आघाडीच्या संख्याबळाच्या प्रमाणानुसार शिवसेना पक्षाकडून विजय वसंत इंगोले, तर सांगोला शहर विकास आघाडीमार्फत तनुजा बाळासाहेब एरंडे यांचे नामनिर्देशनपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. दोन्ही नामनिर्देशनपत्र वैध असल्याने दोघांची नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या वेळी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, सर्व नगरसेवक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शहरातील नागरिक तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि नवनिर्वाचित उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांचे अभिनंदन केले.
0 Comments