सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व हुतात्मा दिनानिमित्त सोलापूर शहरात भव्य ‘स्वदेशी संकल्प दौड’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी “स्वदेशीचा स्वीकार – देशाच्या विकासाचा आधार”, “भारतीय वस्तू वापरा, देश मजबूत करा” अशा घोषणा देत स्वदेशी वस्तूंच्या वापराचा संदेश दिला. तसेच “मतदान हा अधिकारच नव्हे तर कर्तव्य आहे”, “लोकशाही बळकट करूया” अशा घोषणा देत मतदान जनजागृती देखील करण्यात आली.
विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा विभाग, स्त्री शक्ती स्वयंसिध्दा केंद्र, प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियान आणि स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही दौड सोलापूर शहरातील रंगभवन येथील विद्यापीठ अभ्यास केंद्रापासून सुरू होऊन डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हुतात्मा चौक येथे सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या रॅलीचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, वित्त व लेखाधिकारी सी. ए. महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. अंजना लावंड तसेच स्वदेशी जागरण मंचचे चन्नवीर बंकुर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा तरुण पिढीने अंगीकार करावा, असे सांगितले. स्वदेशी जागरण मंचचे चन्नवीर बंकुर यांनी स्वदेशी चळवळ ही केवळ आर्थिक नव्हे तर राष्ट्रीय स्वाभिमानाची चळवळ असल्याचे मत व्यक्त केले. या स्वदेशी संकल्प दौडमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व लोकशाही मूल्यांबाबत जागृती निर्माण झाल्याचे चित्र सोलापूर शहरात पाहायला मिळाले.
दौडदरम्यान विद्यार्थ्यांनी “स्वदेशीचा स्वीकार – देशाच्या विकासाचा आधार”, “भारतीय वस्तू वापरा, देश मजबूत करा” अशा घोषणा देत स्वदेशी वस्तूंच्या वापराचा संदेश दिला. तसेच लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी विद्यार्थ्यांनी केले. यावेळी शपथ देखील घेण्यात आली.
0 Comments