संभाजी ब्रिगेड आक्रमक; ‘संभाजी’ कादंबरीतील आक्षेपार्ह मजकूर वगळण्याची मागणी
सातारा (कटूसत्य वृत्त):- नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच संभाजी ब्रिगेडने छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानासाठी नवा लढा उभारला असून, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. सातारा येथे आज होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. विश्वास पाटील लिखित ‘संभाजी’ कादंबरीतील अनैतिहासिक व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर तात्काळ वगळून, समस्त शिवप्रेमींची माफी मागून सदर कादंबरी पुनःप्रकाशित करावी, अन्यथा साहित्य संमेलन होऊ दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अँड. मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशानुसार ही भूमिका मांडण्यात आली. यासंदर्भात आज निवेदनाद्वारे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (मंत्री व स्वागताध्यक्ष), जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक, सातारा यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून, ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि लढाऊ संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित साहित्य लिहिताना ऐतिहासिक सत्यता आणि संवेदनशीलता पाळली जाणे आवश्यक आहे. मात्र ‘संभाजी’ कादंबरीत अनैतिहासिक व आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत, यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे सांगण्यात आले.
या निवेदनावेळी सचिन जगताप (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड), रफीक शेख (माजी जिल्हाध्यक्ष, सातारा), दिगंबर मिसाळ (तालुकाध्यक्ष, माळशिरस), मेहबूब पठाण (संभाजी ब्रिगेड, सातारा), शरीफ काझी यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले की, जोपर्यंत आक्षेपार्ह मजकूर वगळून कादंबरीचे सुधारित पुनःप्रकाशन होत नाही आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली जात नाही, तोपर्यंत साहित्य संमेलनाला विरोध कायम राहील. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या भूमिकेमुळे सातारा येथील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले असून, प्रशासन व आयोजक पुढे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments