जकराया'चे सचिन जाधव यांची राजकारणात 'एंट्री'
जकराया-लोकनेते परिवाराचे मनोमिलन कुरुल (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यात कारखानदारीसह विविध क्षेत्रात अस्तित्व असणाऱ्या जकराया परिवाराचे सर्वेसर्वा तथा जकराया शुगर चे चेअरमन सचिन जाधव यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांना शह देण्यासाठी गोपनीय शहनिती आखली होती त्या माजी आमदार राजन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश समारंभ पार पडल्याने जकराया-लोकनेते परिवाराचे मनोमिलन झाल्याच्या भावना समर्थकांनी व्यक्त करून दाखवल्या आहेत. शिवाय या निमित्ताने तालुक्याची राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागात वटवटे येथे जकराया शुगर च्या माध्यमातून शेतकऱ्यांची बांधिलकी जपणाऱ्या संस्थापक ॲड. बी.बी. जाधव यांनी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणापासून अलिप्त राहणेच पसंत केले होते. अगदी येणकी हे मूळ गाव असतानाही गावच्या राजकारणात त्यांनी कधीच जाहीर सहभाग घेतला नव्हता. मात्र गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे सुपुत्र सचिन जाधव यांनी जकराया परिवाराचा विचारविनिमय मेळावा आयोजित करून अनगरकरांच्या बद्दल रोष व्यक्त केला होता. शिवाय या मेळाव्यात त्यांनी राजू खरे यांना पाठिंबा देत निवडून आणण्यासाठी कामाला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्याच होत्या. मात्र कोणत्याच गावी झालेल्या सभांमध्ये जाहीर व्यासपीठावर न जाता अंतर्गत गाठीभेटी देऊन मनधरणी करत विजयाचा गुलाल शांततेत उधळला होता.
दरम्यान, राजकारणात एन्ट्री करायची हा उदांत हेतू ठेवून काही दिवसांपूर्वी मोहोळ येथे आयोजित केलेल्या समविचार आघाडीच्या बैठकीत त्यांनी आवर्जून उपस्थिती लावत राजकारणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे रणसंग्राम सुरू होणार आहे. काही दिवसातच निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सचिन जाधव यांनी निवडणूक लढवायचीच हे ध्येय ठेवून गटातील प्रमुख गावांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. गाठीभेटीचा सपाटा लावला. मात्र चिन्ह कोणतं..? आणि पक्ष कोणता..? असाच सवाल प्रत्येक ठिकाणी त्यांना विचारला जायचा.
त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या संपर्कातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लोकनेते परिवाराचे तथा काल भाजपवासी झालेले राजन पाटील यांच्याशी सल्लामसलत करून जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव यांचा पक्षप्रवेश सोहळा छोटेखानी पार पडला. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, सरचिटणीस विकास वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे, युवा मोर्चा माजी अध्यक्ष सुदर्शन यादव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अंकुश अवताडे आदी उपस्थित होते.

0 Comments