सोलापूरमध्ये बालेकिल्ल्यातच भाजपाची गोची
1500 नागरिकांनी टाकला बहिष्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी (15 जानेवारी) मतदान पार पडलं. मतदारांनी आपला हक्क बजवावा असं आवाहन सर्वांकडून सातत्यानं करण्यात येत होतं.
पण सोलापूरमध्ये एक वेगळाच प्रकार घडला आहे.आपल्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा राग मनात धरून सोलापूरमधील तब्बल 1500 नागरिकांनी मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला.
काय आहे कारण?
सोलापूर महापालिकेच्या प्रभाग 26 मधील नागरिकांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. रुबी नगर ते अवंती नगर या दरम्यानच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या परिसरातील चार सोसायट्यांमधील नागरिकांना मुख्य रस्त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
विशेष म्हणजे 30 ते 35 वर्षांपूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला होता. मात्र आता हा रस्ता बंद करण्यात आला असून त्यामुळे दीड हजार लोकवस्तीला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही महापालिका प्रशासन या प्रकरणात कोणताही ठोस हस्तक्षेप करत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
मोठ्या नेत्याचा प्लॉट अडथळा !
या रस्त्याच्या रखडण्यामागे एक राजकीय कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित रस्त्याच्या मधोमध काँग्रेसच्या एका माजी आमदाराचा मोठा प्लॉट असल्याची चर्चा परिसरात आहे. या मोठ्या नेत्याच्या हितसंबंधांमुळेच हक्काचा रस्ता अडवला जात असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. रस्ता नसल्यामुळे दैनंदिन कामांसाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते, मात्र राजकीय दबावापोटी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करत असल्याची भावना येथील रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे.
भाजपाच्या बालेकिल्ल्यात उमेदवारांची पाठ
प्रभाग 26 हा भाग भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र येथील संताप इतका मोठा आहे की, या चार कॉलनींमध्ये साधे मत मागण्यासाठी देखील कोणताही उमेदवार किंवा राजकीय पक्षाचा पदाधिकारी फिरकलेला नाही. मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीने उमेदवार या भागाकडे फिरकले नसल्याचे बोलले जात आहे. मत मागण्यासाठी कोणी आले नाही आणि आमचा प्रश्नही सुटत नाही, मग मतदान कोणाला करायचे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या बहिष्काराच्या अस्त्रानंतर तरी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

0 Comments