अकलूज आगारात रस्ता सुरक्षितता अभियान उत्साहात सुरू
अकलूज (कटूसत्य वृत्त):- १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत, अकलूज आगार सोलापूर विभाग राज्य परिवहन महामंडळा मार्फत, रस्ता सुरक्षितता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाची औपचारिक सुरुवात १ जानेवारी रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले यांच्या अनमोल मार्गदर्शनाने झाली .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे एआरटीओ अश्विनकुमार पोंदकुले, मोटार वाहन निरीक्षक सचिन झाडबुके, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शीतल शिंदे, हे उपस्थित होते. त्याचबरोबर अकलूज आगाराचे, आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक राजेंद्र राऊत, स्थानक प्रमुख दत्तात्रय रायबान वरिष्ठ लिपीक रविराज भांगे, वरिष्ठ लिपीक लक्ष्मण बानेवाड, यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी, चालक, वाहक व यांत्रिकी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी चालक व वाहक यांना रस्ता सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, वेगमर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन, मद्यपान करून वाहन न चालवणे, मोबाईलचा वापर टाळणे तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, वाहतूक नियमांचे पालन करणे हे केवळ कायद्याचे बंधन नसून समाजहितासाठी अत्यावश्यक आहे. नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन मानवी जीविताची हानी टाळता येते व सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित व विश्वासार्ह बनते.
सार्वजनिक वाहतुकीतील चालक व वाहक यांच्यावर मोठी जबाबदारी असून त्यांच्या दक्षतेवर अनेक प्रवाशांचे प्राण अवलंबून असतात. त्यामुळे सुरक्षित, संयमी व जबाबदार वाहनचालन ही काळाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले.
यावेळी विना अपघात सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांचा तसेच बसची यांत्रिक देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे कर्मचारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप वरिष्ठ लिपीक रविराज भांगे यांनी केले तर प्रास्तविक आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी केले.
.png)
0 Comments