यंदा महापौर धनुष्यबाणाचाच!”
शिवसेनेचा दावा; वचननाम्यात मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य
भाजपकडून दहशतीच्या राजकारणाचा आरोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, “यंदा महापौर धनुष्यबाणाचाच होणार” असा ठाम दावा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून करण्यात आला आहे. गेल्या साठ वर्षांत कधीही न पाहिलेली अशी भयावह राजकीय परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली असून, भाजपकडून दहशतीचा वापर करून निवडणुका घेतल्या जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केला.
निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या टप्प्यापर्यंत सर्वत्र भीतीचे वातावरण पसरवले जात असून, सामान्य नागरिकांसह कार्यकर्त्यांनाही दबावाखाली ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “सोलापूरच्या इतिहासात इतके भयावह वातावरण कधीच नव्हते,” असे स्पष्ट शब्दांत शिंदे म्हणाले.
शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची आघाडी महापालिकेत सत्तेत आल्यानंतर सोलापूर शहर दहशतमुक्त करण्याचा ठाम निर्धार शिवसेनेच्या आगामी वचननाम्यात करण्यात आला आहे. दहशतीच्या राजकारणाला सोलापूरकर कंटाळले असून, भयमुक्त वातावरणात जगण्याचा हक्क नागरिकांना मिळालाच पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
शिवसेना लवकरच आपला अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करणार असून, त्यामध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले. आगामी पाच वर्षांच्या महापालिका कारभारात केवळ राजकारण नव्हे, तर प्रत्यक्ष जनहिताचे काम केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेला सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी, अस्वच्छता, आरोग्य सेवा आणि नागरी सुविधा यावर ठोस व कालबद्ध उपाययोजना करण्याची हमी शिवसेनेच्या वचननाम्यात दिली जाणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर आधारित विकासात्मक आणि लोकाभिमुख राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शहराचा कारभार पारदर्शक, भयमुक्त आणि जनतेच्या हिताचा राहील, असा विश्वास व्यक्त करत “सोलापूरकर यंदा धनुष्यबाणालाच साथ देतील,” असा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

0 Comments