शिंदखेडाराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
आता जिजाऊ भक्तांच्या आगमनाची प्रतीक्षा – सौरभ खेडेकर
सिंदखेडाराजा (कटूसत्य वृत्त) :- राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडाराजा येथे तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आता केवळ जिजाऊ भक्तांच्या आगमनाची प्रतीक्षा असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर यांनी केले. जिजाऊ जन्मोत्सवाच्या आयोजनाबाबत जिजाऊ सृष्टी येथे दुसरी आढावा बैठक आज पार पडली.
या बैठकीत मुख्य सोहळ्यासाठी उभारण्यात आलेला भव्य शामियाना पूर्णतः तयार झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच जिजाऊंच्या जीवनकार्य, शिवस्वराज्याची संकल्पना व इतिहासावर आधारित पुस्तकांचे स्टॉल्सही पूर्णत्वास गेल्याचे आयोजकांनी सांगितले. भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी आयोजन समिती सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पोलीस प्रशासनासोबत सविस्तर नियोजन
जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी राज्यभरातून मोठ्या संख्येने जिजाऊ भक्त उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता, पोलीस प्रशासनासोबत दिवसभराच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः पार्किंगपासून सभास्थळापर्यंत भाविकांना होणारा त्रास टाळण्यासाठी मुख्य पार्किंगपर्यंत वाहने सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
यावर्षी जिजाऊ भक्तांसाठी शटल सेवा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असून, याबाबत प्रशासनाने अतिशय सकारात्मक भूमिका घेत पूर्ण सहकार्याची हमी दिली असल्याची माहिती देण्यात आली.
प्रशासन व आयोजन समितीची उपस्थिती
या बैठकीस डीवायएसपी कदम मॅडम, स्थानिक ठाणेदार तसेच जिजाऊ जन्मोत्सव आयोजन समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडावा, यासाठी प्रशासन व आयोजकांमध्ये समन्वय साधण्यात आला.
‘एकच वारी – १२ जानेवारी’चा संदेश
यावर्षीचा जिजाऊ जन्मोत्सव अधिक प्रेरणादायी व ऐतिहासिक ठरणार असून, “एकच वारी – १२ जानेवारी… उत्साहात या, वाजत-गाजत या” असा संदेश देत राज्यभरातील जिजाऊ भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सौरभ खेडेकर व आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.
राजमाता जिजाऊंच्या विचारांना अभिवादन करत शिवरायांच्या स्वराज्यसंकल्पनेला बळ देणारा हा जन्मोत्सव सिंदखेडाराजाच्या भूमीत पुन्हा एकदा इतिहास घडवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0 Comments