मुख्यमंत्र्यांनी दावोस मधून अनुभवला भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरार
पुणे(कटूसत्यवृत्त):- महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला आज सुरूवात झाली. देशातील ही पहिलीच आंतरराष्टीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले.
‘बजाज पुणे ग्रँड टूर’ला जागतिक स्तरावर ‘टूर डी फ्रान्स’सारख्या स्पर्धांना असलेली प्रतिष्ठा मिळली आहे. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दावोस येथील औद्योगिक परिषदेसाठी जाण्यापूर्वी शुभारंभ कार्यक्रमात जगभरातील सायकलपटूंचे स्वागत केले होते. दावोस येथे राज्याच्या औद्योगिक विकासासाठी विविध उद्योग संस्थांशी सामंजस्य करार करण्यात व्यस्त असतांनाही त्यांनी महाराष्ट्र आणि पुण्याची आठवण ठेवली. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या या महत्वाच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांनी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांच्या लॅपटॉपवर स्पर्धेतील थरार अनुभवला.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत असतांना त्यांनी सायकलपटूंच्या कौशल्याचेही कौतुक केले. सायकलपटूंना पुण्यात मिळणारा प्रतिसाद, इथेले उत्सवाचे स्वरुप, सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेली तरुणाई पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. ही स्पर्धा राज्यातील क्रीडा क्षेत्राला प्रेरक ठरेल आणि सायकलचे शहर ही पुण्याची जुनी ओळख नव्या रुपात पुढे येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी गेले आहेत. दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमात दोन्ही देशातील वेळांचा फरक लक्षात घेवून त्यांनी स्पर्धेच्यावेळी थेट प्रक्षेपण पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सोबत असलेल्या अधिकाऱ्यांनाही या गोष्टीचे कौतुक वाटले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारसू यांनी देखील थेट प्रक्षेपण पाहताना स्पर्धेचा आनंद घेतला.
एका बाजूला महाराष्ट्रात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यासाठी विविध देशांतील उद्योगसमूहांसोबत सामंजस्य करार होत असताना, दुसऱ्या बाजूला राज्यातील क्रीडा क्षेत्रात घडणाऱ्या या ऐतिहासिक घडामोडीकडे दिलेले विशेष लक्ष क्रीडा क्षेत्राला निश्चितपणे प्रोत्साहन देणारे आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या ‘ग्रँड टूर’ स्वरूपाच्या या स्पर्धेला जागतिक व्यासपीठावरून मिळालेली ही दाद क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम, अत्याधुनिक आयोजन आणि विविध देशांतील नामवंत सायकलपटूंचा सहभाग यामुळे ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ने पुण्याला जागतिक सायकलिंगच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावरून या स्पर्धेचा थरार अनुभवणे, हे आयोजक, खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींसाठी मोठे प्रोत्साहन ठरले असून, यामुळे महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती अधिक बळकट होण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.

0 Comments