Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिका निवडणूक : प्रभाग १३ मध्ये तिरंगी लढतीची उत्सुकता

 महापालिका निवडणूक : प्रभाग १३ मध्ये तिरंगी लढतीची उत्सुकता
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाजप व माकपचे प्राबल्य राहिलेल्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजप, माकप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात चुरशीची तिरंगी लढत होणार आहे. विविध सामाजिक घटकांचे संमिश्र मतदारसंघ असलेल्या या प्रभागात निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रभागात भाजपला मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. त्याचबरोबर कामगारांची संख्या अधिक असल्याने माकपचेही येथे वर्चस्व दिसून येते. जातीय बलाबल संमिश्र असून पद्मशाली समाजाची लक्षणीय संख्या आहे. याशिवाय विविध जाती-जमातींसह मोची समाज तसेच काही प्रमाणात मुस्लीम बांधवांची संख्याही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला मिळतो, याबाबत उत्सुकता आहे.
गत निवडणुकीचा आढावा :
मागील महापालिका निवडणुकीत प्रभाग १३ अ मधून भाजपचे सुनील कामाठी यांनी माकपचे भालचंद्र म्हेत्रे, काँग्रेसचे माशप्पा विटे व शिवसेनेचे अनिल उकरंडे यांचा पराभव केला होता. १३ ब मधून भाजपच्या प्रतिभा मुदगल यांनी माकपच्या नसीमा शेख यांना पराभूत केले. १३ क मधून माकपच्या कामिनी आडम यांनी शिवसेनेच्या शिवम्मा बंदपट्टे व भाजपच्या सरिता वडनाल यांचा पराभव केला. तर १३ ड मधून भाजपचे श्रीनिवास रिकमल्ले यांनी माकपचे मुरलीधर सुंचू व शिवसेनेचे रवींद्र भीमनपल्ली यांना पराभवाची धूळ चारली होती. त्या वेळी या प्रभागातून भाजपचे तीन व माकपचा एक नगरसेवक निवडून आला होता.
यंदाच्या निवडणुकीतील उमेदवार :
प्रभाग १३ अ (अनुसूचित जाती – महिला राखीव):
भाजपकडून दिवंगत माजी नगरसेवक सुनील कामाठी यांच्या पत्नी सुनीता कामाठी, शिवसेना (शिंदे गट) कडून गीता गोणे (म्हेत्रे) व माकपकडून सुषमा सरवदे यांच्यात तिरंगी लढत आहे.
प्रभाग १३ ब (ओबीसी महिला राखीव):
भाजपच्या अंबिका चौगुले, शिवसेना (शिंदे गट) च्या शिवम्मा बंदपट्टे व माकपच्या अनिता आडम यांच्यात निवडणूक होत आहे.
प्रभाग १३ क (सर्वसाधारण):
भाजपकडून सत्यनारायण गुर्रम, माकपकडून श्रीनिवास म्हेत्रे व शिवसेना (शिंदे गट) कडून जयंत होले पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभाग १३ ड (सर्वसाधारण):
भाजपचे विजय चिप्पा, शिवसेना (शिंदे गट) चे श्रीधर आरगोंडा, शिवसेना (ठाकरे गट) चे वल्लभ चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे इम्रान पठाण यांच्यासह अपक्ष म्हणून प्रशांत जमादार, निरंजन बौद्धल, अशोक माचन व गणेश म्हेत्रे असे एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
एकूणच प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्व पक्षांनी ताकद लावली असून, कोण बाजी मारणार याकडे सोलापूर शहराचे लक्ष लागून आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments