माजी सभागृह नेता विरुद्ध माजी स्थायी समिती सभापती; प्रभाग ३ लक्षवेधी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला प्रभाग क्रमांक तीन एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र जिल्ह्यातील भाजपच्या राजकारणाचा उगम याच प्रभागातून झाल्याचे मानले जाते. यंदाच्या महापालिका निवडणुकीत या प्रभागात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस यांच्यात थेट तिरंगी लढत होत असून दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने कोण बाजी मारणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
या प्रभागात शाहीर वस्ती, भवानी पेठ, घोंगडे वस्ती, बलिदान चौक, कुंभार वेस, इंदिरा वसाहत, जोडभावी पेठ, मंगळवार बाजार, दयानंद कॉलेज परिसर, मंत्री चंडक नगर आदी भागांचा समावेश आहे. प्रभागात लिंगायत समाजाचे प्राबल्य असून त्याखालोखाल धनगर, मुस्लीम, दलित समाजासह कोळी, वडार, ढोर, चांभार, सुतार आदी अठरापगड समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.
१९८५ पासून स्व. लिंगराज वल्याळ यांच्या माध्यमातून या भागात भाजपच्या विस्ताराला सुरुवात झाली. याच प्रभागातून अनेक नेत्यांची राजकीय कारकीर्द बहरली आहे. काँग्रेसकडून स्व. बाबूराव चाकोते व विश्वनाथ चाकोते यांनी याच भागातून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. या प्रभागात एकूण ३६ हजार १८ मतदार आहेत.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युतीत हा प्रभाग शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आला आहे.
प्रभाग ३ अ मध्ये भाजपकडून राजू पाटील, काँग्रेसकडून रोहित कारमपुरी, तर शिवसेना शिंदे गटाकडून सुरेश बिद्री रिंगणात आहेत. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने दशरथ जमादार यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवल्याने येथे बंडखोरी पाहायला मिळत आहे.
प्रभाग ३ ब मध्ये भाजपच्या स्वाती बडगू यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या उर्वशी पाटील व काँग्रेसच्या महानंदा शिरशीकर यांनी आव्हान दिले आहे.
प्रभाग ३ क मध्ये कुमुद अंकारम यांनी माघार घेतल्याने भाजपच्या रंजीता चाकोते यांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. येथे भाजपच्या रंजीता चाकोते व काँग्रेसच्या रमाबाई पांडगळे यांच्यात थेट लढत होत आहे.
प्रभाग ३ ड मध्ये भाजपकडून तिकीट न मिळाल्याने माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. भाजपकडून माजी स्थायी समिती सभापती संजय कोळी, तर काँग्रेसकडून सिध्दाराम चाकोते रिंगणात असून दिग्गज उमेदवारांच्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपमधील अंतर्गत वाद आणि बंडखोरीमुळे या प्रभागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपच्या विरोधात प्रथमच शिवसेना आणि काँग्रेसची थेट लढत होत असल्याने निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे. अंतर्गत खदखदीचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता वर्तवली जात असून, प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा करत असला तरी अंतिम कौल मतदार राजा कोणाला देणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

0 Comments