Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग ७ : तिरंगी-चौरंगी लढतींनी निवडणूक तापली

 प्रभाग ७ : तिरंगी-चौरंगी लढतींनी निवडणूक तापली

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक ७ हा आता केवळ महापालिकेचा निवडणूक प्रभाग न राहता सत्तासंघर्ष, प्रतिष्ठा आणि राजकीय अस्तित्वाच्या लढाईचा केंद्रबिंदू ठरला आहे. दिग्गजांचा प्रभाग म्हणून ओळख असलेल्या या भागात यंदाची महापालिका निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी, गुंतागुंतीची आणि अत्यंत चुरशीची ठरणार आहे. त्यामुळे या प्रभागात अखेर कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी या प्रभागात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच थेट लढती पाहायला मिळाल्या होत्या. मात्र, यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजपने आक्रमक रणनीती आखत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांचा पक्षप्रवेश करून या प्रभागात ताकद वाढवली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी नगरसेवक तथा सध्याचे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे स्वतः या प्रभागात प्रचारात उतरले असून, ही निवडणूक त्यांच्या संघटनशक्तीची कसोटी मानली जात आहे. शिंदेसेनेला चितपट करण्याचा डाव भाजपने आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, शिंदे गटाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. भाजपकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे, शिवसेना ठाकरे गटाचे समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांच्या कन्या उत्तरा चरडे-बलुटे यांना ऐनवेळी उमेदवारी देत भाजपने मोठी राजकीय खेळी केली आहे. यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांच्या पत्नी श्रद्धा पवार तसेच पत्रा तालीम भागातील कार्यकर्ते आनंद कोलारकर यांनाही भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडून चंदा पिसे घराण्यातील दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून अनिकेत पिसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून शिंदे गटात आलेले ज्ञानेश्वर सपाटे यांच्या पत्नी मनोरमा सपाटे यांनाही मैदानात उतरवण्यात आले आहे. ज्ञानेश्वर सपाटे हे माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे असून, सपाटे परिवाराचे या भागात मोठे सामाजिक व राजकीय कार्य आहे. त्यामुळे पत्नीच्या उमेदवारीद्वारे आपले राजकीय वजन सिद्ध करण्यासाठी ते रात्रंदिवस मतदारांच्या संपर्कात आहेत.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून विशाल कणसे यांच्या पत्नी मनीषा कणसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निराळे वस्ती भागातील मनीषा माने या दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या सोबतीला गादेकर पारायातील शीतल गादेकर आणि युवा कार्यकर्ते सुमित भोसले यांनी ‘तुतारी’च्या माध्यमातून स्वतंत्र ताकद उभी केली आहे. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाकडून मनीषा भोसले यांनीही आपले नशीब आजमावले आहे.
या सर्व घडामोडींमुळे प्रभाग ७ मधील अ, ब, क विभागांत तिरंगी व चौरंगी लढती निर्माण झाल्या असून मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निकाल कोणत्याही बाजूने झुकू शकतो.
मात्र, या सगळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे आणि माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे यांच्यातील थेट संघर्षाने. दोन दिग्गजांमधील ही लढत केवळ विजयापुरती मर्यादित नसून राजकीय अस्तित्वाची अंतिम परीक्षा मानली जात आहे. पराभवाचा अर्थ पुढील राजकीय वाटचालीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणे असल्याने पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत.
इतकेच नव्हे तर आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासाठीही हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनला आहे. मात्र अंतर्गत गटबाजी, पक्षांतर्गत नाराजी आणि मित्रपक्षांतील संघर्ष यामुळे मतदारांचा कौल नेमका कुणाकडे जाईल, याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. एकूणच प्रभाग क्रमांक ७ मधील निवडणूक ही विकासापेक्षा अधिक सत्ता, स्वाभिमान आणि अस्तित्व याभोवती फिरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments