माजी महापौरांसह दिग्गज मैदानात; भाजपसमोर मोठे आव्हान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरात भाजपची लाट असल्याचे चित्र असले तरी काही प्रभागांमध्ये पक्षाला यश मिळवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. प्रभाग क्रमांक २३ हा त्यापैकीच एक असून येथे माजी महापौरासह चार माजी नगरसेवक पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे विरोधकांनी भाजपपुढे कडवे आव्हान उभे केले असून ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
सोरेगाव ते सलगर वस्ती सेटलमेंट असा विस्तीर्ण परिसर या प्रभागात येतो. प्रतापनगर, रामलिंग नगर, द्वारकानगरी, कोटणीसनगर, मेहेरनगर, सदिच्छा सोसायटी, माशाळ वस्ती, राजस्वनगर यासह अनेक लहान-मोठ्या नगरांचा या प्रभागात समावेश आहे. सुमारे ४० हजार मतदार असलेल्या या प्रभागात तरुण मतदारांची संख्या मोठी आहे. एकूण चार जागांसाठी ही निवडणूक होत असून सर्वच जागांवर भाजपला कडवे आव्हान मिळत आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गात चुरस
अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपकडून सत्यजित वाघमोडे रिंगणात असून त्यांच्या विरोधात अनिल बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस), मदनलाल पोलके (शिवसेना), सुनीता रोटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), धर्मराज डुरके (वंचित बहुजन आघाडी), नवनाथ भजनावळे व भारतीय हत्तीकट्टी (अपक्ष) असे एकूण सात उमेदवार मैदानात आहेत. माजी नगरसेविका सुनीता रोटे या याच प्रभागातून निवडून आल्या असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मदनलाल पोलके हे शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांच्याबाबत जनतेत सहानुभूती आहे. सत्यजित वाघमोडे यांचाही लोकमंगल परिसरात चांगला संपर्क आहे.
ओबीसी महिला प्रवर्गात भाजपची अडचण
ओबीसी महिला प्रवर्गातून भाजपने आरती वाकसे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपच्या माजी नगरसेविका मेनका राठोड यांनी पुन्हा निवडणूक लढवल्याने भाजपसमोर अडचण निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या कृष्णाबाई बिराजदार व काँग्रेसच्या दीपाली शहा यांनीही आव्हान दिले आहे. वैभव फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य केल्याने दीपाली शहा यांची ओळख निर्माण झाली आहे.
सर्वसाधारण महिला प्रवर्गात दिग्गज आमनेसामने
सर्वसाधारण महिला प्रवर्गात भाजपने ज्ञानेश्वरी देवकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या पती महेश देवकर हे कंत्राटदार असून आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. रस्ते व इतर विकासकामांमुळे त्यांनी आपली प्रतिमा तयार केली आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी महापौर अलका राठोड यांचे त्यांच्यासमोर जबरदस्त आव्हान आहे. २०१२ मध्ये काँग्रेसकडून निवडून आलेल्या अलका राठोड यांनी महापौरपदाच्या काळात केलेल्या कामांमुळे त्यांचा जनसंपर्क मजबूत आहे. याशिवाय चित्रा कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), सुगंधा कोळी (बसपा), लता गायकवाड (शिवसेना) व रूपाली चोळ्ळे (अपक्ष) या उमेदवारही मैदानात आहेत. लता गायकवाड या माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या भगिनी आहेत.
सर्वसाधारण प्रवर्गात बहुरंगी लढत
सर्वसाधारण प्रवर्गातून एकूण नऊ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपने राजशेखर पाटील यांना उमेदवारी दिली असून सोरेगाव परिसरात त्यांचा चांगला संपर्क आहे. ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव पुन्हा निवडणूक लढवत असून सलगर वस्ती सेटलमेंट भागात त्यांचा प्रभाव आहे. शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश राठोड मैदानात आहेत. भाजपने शब्द देऊनही उमेदवारी न दिल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून विविध उपक्रमांमुळे ते चर्चेत आहेत. याशिवाय राहुल जरग (बसपा), सुभाष गायकवाड (वंचित बहुजन आघाडी) तसेच हरी चव्हाण, विजय चोळ्ळे, शफी मुलाणी व वैभव राऊत (अपक्ष) हेही उमेदवार रिंगणात आहेत.
भाजपमधील नाराजी ठरणार डोकेदुखी?
मागील निवडणुकीत या प्रभागातून भाजपला केवळ एकच जागा मिळाली होती. यंदा माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे इच्छुक होते. स्वीकृत सदस्य म्हणून पाच वर्षे त्यांनी रस्ते, जलवाहिन्या आदी कामांतून लोकमानस तयार केले आहे. मात्र उमेदवारी न मिळाल्याने ते भाजपवर नाराज असून, ही नाराजी विरोधकांच्या पथ्यावर पडून भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

0 Comments