Hot Posts

6/recent/ticker-posts

दुबार मतदारांवर हल्ल्यासाठी मनसे-उद्धवसेनेची ‘भगवा ब्रिगेड’ तैनात

 दुबार मतदारांवर हल्ल्यासाठी मनसे-उद्धवसेनेची ‘भगवा ब्रिगेड’ तैनात



मुंबई (कटूसत्य वृत्त):- दुबार व बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून मनसे आणि उद्धवसेना आक्रमक झाल्या असून, मतदानाच्या दिवशी कारवाईसाठी २,००० कार्यकर्त्यांची फौज तैनात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या फौजेला ‘भगवा ब्रिगेड’ असे नाव देण्यात आले आहे. १५ जानेवारी रोजी मतदानादरम्यान मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध भागांत तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


खासदार संजय राऊत आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दुबार व बोगस मतदारांना रोखण्याबाबत कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबई-ठाणे परिसरात दुबार मतदारांमुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होत असून, त्याला रोखण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी सज्ज आहोत.


निवडणूक यंत्रणेच्या माहितीनुसार, मुंबईत सुमारे १ लाख ६८ हजार ३५० दुबार मतदार आढळले आहेत. यापैकी ४८ हजार मतदारांनी एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचे हमीपत्र दिले आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे १ लाख २० हजार दुबार मतदारांमुळे घोळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


अमित ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या प्रश्नावर तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की, बाहेरच्या राज्यांतून मोठ्या संख्येने मतदार आणून राज्यावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर तो स्वीकारार्ह नाही. मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी अनधिकृत मतदान करणाऱ्यांना रोखले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.


दरम्यान, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांना मतदान केंद्रांबाहेर संशयित दुबार मतदार आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्याची शक्यता आहे.


या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी टीका करताना म्हटले की, मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांना आता भगवा आठवत आहे. दुबार मतदारांचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवला पाहिजे, हिंसाचाराला कोणतेही समर्थन देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, एका परदेशी वृत्तवाहिनीच्या मराठी आवृत्तीला दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरे यांनी राज ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर परप्रांतीयांना मुंबईत आणणाऱ्या रेल्वे बंद करण्याचा दावा केला. या वक्तव्यामुळेही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments