Hot Posts

6/recent/ticker-posts

सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही व जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

 सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही व जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न : राहुल गांधी



उदगमंडलम (कटूसत्य वृत्त):- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. देशातील सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही व्यवस्था कमकुवत करण्याचा आणि जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तामिळनाडूतील गुडलूर येथे सेंट थॉमस शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राहुल गांधी यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशातील लोकशाही धोक्यात असल्याची चिंता व्यक्त केली. निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त व महत्त्वाच्या संस्थांवर दबाव आणला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारच्या विचारांशी सहमत नसलेल्यांना धमकावले जात असून, त्यामुळे लोकशाही मूल्यांवर गदा येत असल्याचे त्यांनी सांगितले.
“भारत हा लोकशाही देश आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र सध्याच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत निर्भयपणे प्रश्न विचारणाऱ्या युवकांची देशाला नितांत गरज आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
या कार्यक्रमापूर्वी राहुल गांधी यांनी शाळेत साजऱ्या करण्यात आलेल्या ‘पोंगल’ उत्सवातही सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यावेळी त्यांनी संगीताच्या तालावर ठेका धरला. तसेच ‘पोंगल’ ही पारंपरिक मिठाई बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत, ती तयार करण्याची पद्धतही जाणून घेतली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या वतीने राहुल गांधी यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
Reactions

Post a Comment

0 Comments