टेंभुर्णी येथे सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याची मागणी
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील भिमा पाटबंधारे विभागाच्या (कुर्डूवाडी रोड इरिगेशन कॉलनी) जागेवर सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी डी.व्ही.पी. बँकेचे चेअरमन औदुंबर (भाऊ) देशमुख यांनी टेंभुर्णी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
टेंभुर्णी शहरामध्ये युवक व विद्यार्थ्यांसाठी सध्या कोणतेही सुसज्ज क्रीडा संकुल उपलब्ध नाही. गावातील अनेक युवक विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवत असूनही, योग्य मैदान व क्रीडा सुविधांचा अभाव असल्याने त्यांचा नियमित सराव अडचणीत येत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाची सुरुवात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावी, या उद्देशाने औदुंबर देशमुख यांनी ग्रामपंचायतीकडे हे निवेदन सादर केले आहे.
टेंभुर्णी गावात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल तसेच इतर मैदानी खेळांविषयी युवकांमध्ये विशेष रुची आहे. सुसज्ज क्रीडा संकुल उपलब्ध झाल्यास युवकांचा सर्वांगीण विकास होईल, त्यांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे शक्य होईल तसेच आरोग्यदृष्ट्याही लाभ होईल. याशिवाय जिल्हा व राज्यस्तरीय खेळाडू घडवण्याची संधी निर्माण होऊन गावाच्या नावलौकिकात भर पडेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भिमा पाटबंधारे विभागाकडे कुर्डूवाडी रोड इरिगेशन कॉलनी परिसरात अंदाजे १५ एकर जागा शिल्लक असून या जागेवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उजनी नगर (टेंभुर्णी) यांच्यासाठी आवश्यक इमारत व क्रीडांगण उभारता येऊ शकते. उर्वरित जागेवर टेंभुर्णीतील खेळाडूंसाठी आधुनिक क्रीडा संकुल उभारणे शक्य आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच सदर जागा सोलापूर–पुणे रोड व कुर्डूवाडी रोड या दोन प्रमुख रस्त्यांच्या लगत असल्याने येथे व्यापारी संकुल उभारण्याची मोठी संधी आहे. टेंभुर्णीतील वाढत्या व्यापारी वर्गासाठी दर्जेदार व्यापारी संकुल उभारल्यास ग्रामपंचायतीच्या महसुलातही लक्षणीय वाढ होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ज्या पद्धतीने सार्वजनिक रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली, त्याच धर्तीवर क्रीडा संकुल, उजनी नगर शाळा व व्यापारी संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत दि. २६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव मंजूर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन ग्रामविकास अधिकारी, टेंभुर्णी यांना देण्यात आले आहे.
यावेळी डी.व्ही.पी. बँकेचे चेअरमन व माजी अध्यक्ष, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) औदुंबर (भाऊ) देशमुख, टेंभुर्णी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विलास (काका) देशमुख, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सुधीर (दादा) पाटील, गणेश खुळे आदी उपस्थित होते.

0 Comments