प्रत्येक तालुक्याला बुद्धविहार व्हावे : माजी आमदार राजेंद्र राऊत
बार्शी (कटूसत्य वृत्त):- बुद्धांचा विचार हा जगाला शांती, समता व बंधुभावाचा संदेश देणारा असल्याने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बुद्धविहार उभारण्यात यावा, अशी भूमिका माजी आ. राजेंद्र राऊत यांनी मांडली.प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रावस्ती बुद्धविहार परिसरात आयोजित धम्म परिषद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी धर्मानंद कोसंबी विचारपीठावर छत्रपती संभाजीनगर येथील भन्ते करुणानंद महाथेरो, श्रीलंकेचे घंते यश, भन्ते धम्मबोधी थेरो, भन्ते धम्मानंद थेरो, भन्ते शासनसुरी तसेच भिक्खुनी आर्याजी उपस्थित होते. कार्यक्रमात नूतन नगरसेवक संदेश काकडे यांचा सत्कार करण्यात आला.
राऊत पुढे म्हणाले की, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बुद्धविहार उभारण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचविणार असून, या उपक्रमासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महात्मा फुले नगरातील श्रावस्ती बुद्धविहाराच्या प्रांगणात झालेल्या या धम्म परिषदेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सभागृहास गोपाळबाबा वलंगकर यांचे नाव देण्यात आले होते, तर विचारपीठाला बौद्ध साहित्याचे अभ्यासक धर्मानंद कोसंबी यांचे नाव देण्यात आले होते.
या धम्म परिषदेसाठी उमरगा, नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव, कळंब, परंडा, सोलापूर, कुर्डुवाडी, अकलूज व माळशिरस आदी परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावस्ती बुद्धविहाराचे मार्गदर्शक भन्ते सुमेध नागसेन यांनी केले. प्रास्ताविक विष्णू कांबळे यांनी मांडले तर आभार प्रा. डॉ. शशिकांत गायकवाड यांनी मानले.
0 Comments