अकलूज येथे प्रचाराच्या शुभारंभाची सभा बदलली शोक सभेत
मोहिते पाटील गटाकडून अजित पवारांना श्रद्धांजली
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शंकरनगर-अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर आज दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मोहिते पाटील गटाच्या जि. प. व पं. स. उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार होता. सभेची पूर्ण तयारी झाली होती. माळशिरस तालुक्याच्या कानकोपऱ्यातून कार्यकर्ते हजर झाले होते. पण तेवढ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. प्रचार सभा रद्द होऊन तीचे रूपांतर शोक सभेत झाले.
आम्ही वेगळ्या पक्षात असलो तरी मोहिते पाटील परिवार आणी पवार परिवाराचे ऋणानुबंध अतिशय जुने आहेत. मागील चार दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणा विषयी आम्ही त्यांची भेट घेऊन आलो होतो. आम्ही मागील काही काळा पूर्वी सोलापूर ते इंदापूर असा एकाच गाडीतून प्रवास केला होता. अतिशय शिस्तप्रिय, हुशार आणी धडाडीचे नेते म्हणून अजित पवार राज्याच्या राजकारणात अजित पवार यांची ओळख होती. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे असे विचार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले.
एक राजकारण धुरंधर, मुत्सद्दी आणी खमक्या नेता म्हणून अजितदादांची सगळ्या महाराष्ट्राला ओळख होती. मोहिते पाटील परिवाराचे पवार परिवाराशी तीन पिढ्याचे संबंध होते. राजकारणात जरी पक्ष बदलले गेले असले तरी आमचे वैयक्तिक संबंध कधी दुरावले नाहीत. अजित दादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचा एक कणखर नेता गेला आहे. आमच्या घरातील एक व्यक्ती गेली असल्याचे दुःख आम्हास झाले असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले. श्रद्धांजली अर्पण करताना रणजितदादाचा कंठ दाटून आला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक खंबीर नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सारिपाट त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. राज्याच्या राजकारणात त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी त्यांनी भरीव काम केलेले आहे. त्यांच्या जाण्यामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत आमदार उत्तमराव जानकर यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील, ऍड. प्रकाश पाटील, हरिभाऊ मगर, संग्रामसिंह जहागीरदार यांच्यासह शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार, अनेक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
अकलूज येथील प्रचार शुभारंभा नंतर निमगाव येथे मोहिते पाटील गट व मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारा निमित्त आमदार भरतशेठ गोगावले यांची प्रचारनिमित्त जाहीर सभा घेण्यात येणार होती. ती ही रद्द करण्यात आली आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच अकलूज परिसरातील बाजारपेठ उत्स्फूर्तपने बंद करण्यात आली.
.png)
0 Comments