विठ्ठल परिवाराचा आधारवड हरपला; पंढरपुरात अजितदादांना श्रद्धांजली
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्रासह पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि विकासकामांच्या धडाक्यासाठी ओळखले जाणारे 'दादा' आता आपल्यात नाहीत, या कल्पनेनेच कार्यकर्ते सुन्न झाले आहेत. पंढरपूर येथे सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालय येथे शोकसभेचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी अत्यंत भावूक होत कल्याणराव काळे म्हणाले की, "अजितदादांनी विठ्ठल परिवाराला आणि आम्हाला प्रत्येक संकटात आणि कामात मोलाची मदत केली. सत्तेत असो वा नसो, दादांनी नेहमीच कार्यकर्त्याला बळ दिले. त्यांच्या जाण्याने राजकारणातील एक धगधगता ज्वालामुखी शांत झाला असून, आमच्यासाठी ही कधीही न भरून निघणारी पोकळी आहे. आजचा दिवस येईल हे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते"
या श्रद्धांजली सभेला विठ्ठल परिवारातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने:
गणेश पाटील, युवराज पाटील, समाधान काळे भारत कोळेकर यांच्यासह विठ्ठल परिवारातील विविध संस्थांचे संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. दादांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

0 Comments