कौठाळी येथील सोलार प्लांटवरील चोरीचा पर्दाफाश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मौजे कौठाळी (ता. उत्तर सोलापूर) येथील सोलार प्लांटवर झालेल्या मोठ्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करत एकूण १० लाख ७८ हजार १३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात ५ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, २ विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग उघडकीस आला आहे.
कौठाळी ते वैराग रस्त्यावर पुरुषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सोलार प्लेटपासून वीज निर्मितीचे काम सुरू आहे. या ठिकाणी कॅबिनसमोर ठेवलेले ८ लाख ७८ हजार १९० रुपये किमतीचे सोलार प्लेट व पॅनल स्ट्रक्चर अँगल हे दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११ ते १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची फिर्याद आदित्य भाऊसाहेब जाधव (रा. शारदादेवी नगर, मोहोळ रोड, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी दिली होती. त्यानुसार दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोना अनंत चमके यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कौठाळी येथे शोधमोहीम राबवण्यात आली. मिळालेल्या वर्णनानुसार ५ संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. प्रारंभी टाळाटाळ करणाऱ्या आरोपींनी विश्वासात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली व सोबत २ विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे मान्य केले.
तपासादरम्यान आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले २ लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड ‘दोस्त’ मालवाहू वाहन, तसेच ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचे गौतम कंपनीचे १०२ सोलार प्लेट आणि १ लाख १३ हजार १९० रुपये किमतीचे १४७ धातूचे सोलार पॅनल स्ट्रक्चर अँगल असा एकूण १० लाख ७८ हजार १३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोना अनंत चमके करीत आहेत.
ही कारवाई अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक), प्रितम यावलकर (अपर पोलीस अधीक्षक), संकेत देवळेकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर उपविभाग), राहुल आत्राम (परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली, राहुल देशपांडे (पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली पोहवा राहुल महिंद्रकर, पोना अनंत चमके, पोना लालसिंग राठोड, पोकों पैंगबर नदाफ, पोको वैभव सूर्यवंशी व पोको सागर शिवे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या बजावली.
.png)
0 Comments