वाल्मिक कराडच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केल्याने नागरिकांत संताप
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पुढे आणण्याचा प्रयत्न?
जामखेड (कटूसत्य वृत्त) :- स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणातील कथित मास्टरमाइंड वाल्मिक कराड याच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीची जामखेड नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप होत असून, या नियुक्तीमुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामागे बदलापूर येथील तुषार आपटे प्रकरणासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण करण्याचा हेतू तर नाही ना, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नगरपालिकेचे सभापती राम शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप होत असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा गुन्हेगारांशी संबंधित व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक बनवण्याचा भाजपने चंग बांधला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. “चांगली, स्वच्छ चारित्र्याची, समाजासाठी काम करणारी माणसे उपलब्ध नाहीत का?” असा थेट प्रश्न नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
सदर स्वीकृत नगरसेवक हा शेजारील आमदार महोदयांचा देखील विश्वासू असल्याचे बोलले जात असून, त्यामुळे संपूर्ण नियुक्ती प्रक्रियेवरच संशयाचे सावट निर्माण झाले आहे. सत्तेच्या जोरावर, राजकीय जवळीक वापरून गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींना लोकशाही संस्थांमध्ये प्रवेश दिला जात असेल, तर तो लोकशाहीचा अपमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर “सर्वसामान्य नागरिकांच्या वेदनांचा, पीडितांच्या भावनांचा देखील बाजार मांडला जातो का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. स्व. संतोष देशमुख प्रकरणासारख्या गंभीर घटनांच्या आठवणी ताज्या असताना, अशा व्यक्तींना जबाबदार पदे देणे हे समाजातील असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र करणारे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या नियुक्तीविरोधात विविध स्तरांतून जाहीर निषेध नोंदवला जात असून, संबंधित निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी पारदर्शक, स्वच्छ व नैतिक निकष लागू करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा याविरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही काही सामाजिक संघटनांकडून दिला जात आहे.

0 Comments