सोलापुरात ‘भाजप विरुद्ध भाजप’ रणसंग्राम; बंडखोरीने भाजपची डोकेदुखी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोलापूरच्या राजकारणात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजकीय हालचालींनी शहरातील वातावरण तापले होते. सर्वच प्रमुख पक्षांत उमेदवारीवरून उलथापालथ झाली असली, तरी सर्वाधिक गोंधळ आणि बंडखोरी भाजपमध्येच पाहायला मिळाली.
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेत पक्षनिष्ठा दाखवली असली, तरी अनेक ठिकाणी नाराज उमेदवारांनी थेट बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामी अनेक प्रभागांत भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोरच भाजपचेच अपक्ष उमेदवार मोठे आव्हान उभे करत आहेत. काही प्रभागांत तर ‘भाजप बंडखोर’ नावाने स्वतंत्र पॅनेल उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजप बंडखोरांना शिंदे गटाचा पाठिंबा,प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपचे संतोष भोसले यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र यंदा त्यांना डावलून नवख्या उमेदवाराला संधी दिल्यामुळे ते नाराज झाले. संतोष भोसले यांनी भाजप उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून त्यांना एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून अधिकृत पाठिंबा देण्यात आला आहे.
प्रभाग पाचमध्ये भाजपची नामुष्की,प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपची उमेदवारी बिज्जू प्रधाने व मंदाकिनी तोडकरी यांना दिल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात थेट पॅनेल उभे केले. विशेष म्हणजे, भाजपने उमेदवारी दिलेले समाधान हावळे हेही या बंडखोर पॅनेलमध्ये सहभागी झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे हत्तुरे राष्ट्रवादीत,भाजपचे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी मिळवत त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे.
जगदीश पाटीलांना अश्रू अनावर,भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना यंदा उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षाचा आदेश मान्य करत अर्ज माघार घेतली. मात्र माध्यमांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गॉगल काढून डोळे पुसत ते निःशब्दपणे बाहेर पडले.
भाजपच्या बालेकिल्ल्यातही बंड,प्रभाग क्रमांक तीन भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यंदा माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचा पत्ता कट केल्याने त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. तर बाबूराव जमादार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार संजय कोळी व राजू पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र रंजिता चाकोते यांच्याविरोधातील बंड शमल्याने त्यांना दिलासा मिळाला.
प्रभाग सहामध्येही असंतोष,प्रभाग सहामध्ये उबाठा सेनेचे उमेदवार ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक इच्छुकांची मोठी गोची झाली. नाराज रेखा गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून इतर नाराज कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने भाजपविरोधात पॅनेल उभे करण्याची तयारी सुरू आहे.
पक्षीय स्थिती एक नजर
* भाजपने शहरातील सर्व १०२ जागांवर उमेदवार दिले असून सर्व जागा लढविणारा तो एकमेव पक्ष ठरला आहे. मात्र पक्षांतर्गत बंडखोरी मोठ्या प्रमाणावर आहे.
* दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेसला यंदा केवळ ४७ जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत.
* राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ६२ जागांवर निवडणूक लढवत आहे.
* शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शहरात फक्त १३ जागांवर लढत आहे.
* एकनाथ शिंदे शिवसेना ५७ ते ५८ जागांवर रिंगणात आहे.
* उद्धव ठाकरे शिवसेना २१ जागांवर, तर वंचित बहुजन आघाडीही २१ जागांवर लढत आहे.
* अजित पवार राष्ट्रवादी व शिंदे शिवसेना यांची युती झाली असून दोन्ही पक्ष मिळून सर्व जागा लढवणार आहेत.
* काँग्रेस, ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी, माकप व मनसे यांची आघाडी झाली असली, तरी जागावाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

0 Comments