विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी भयभीत होऊ नये- सपोनि परजणे
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील मांडवे परिसरातील एका शाळेत तीन वर्षांच्या मुलाला चॉकलेट देऊन ओमनी वाहनातून पळवून नेल्याची बातमी काही वृत्तपत्रे व सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. मात्र या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याचे व मुलाच्या म्हणण्यात तथ्य नसल्याने नातेपुते व परिसरातील शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी भयभीत होऊ नये असे आवाहन नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी नातेपुते पोलीस ठाणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले.
दिनांक ४ जानेवारी रोजी मांडवे ता. माळशिरस येथील एका शाळेतील चॉकलेटचे आमिष दाखवून
विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती सदर बातमीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित शाळेत भेट देऊन मुख्याध्यापक व तेथील शिक्षिकांशी चर्चा केली. यावेळी संबंधित घटनेबाबत सखोल चौकशी करण्यात आली असता मुलाच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचे निदर्शनास आले.
पोलीसांनी शाळेतील सर्व शिक्षकांची बैठक घेऊन अशा कोणत्याही घटना घडल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे तसेच अफवा पसरवू नयेत, अशी सूचना केली. सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन सपोनी महारुद्र परजणे यांनी केले आहे.

0 Comments