वीज खंडित, सौरपंप रखडले; रब्बी हंगामात शेतकरी अडचणीत
सतत खंडित होणारी वीज, वाढते वीज बिल आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला असताना शासनाने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र व शाश्वत सिंचनाचा पर्याय म्हणून ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना सुरू केली. या योजनेत सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना केवळ १० टक्के तर अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरून सौर पॅनेल्ससह कृषी पंपाचा संपूर्ण संच दिला जातो. जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपी क्षमतेचे पंप बसविले जातात.
या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर महावितरणमार्फत शेतजमिनीचे सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षण अहवालास मंजुरी मिळाल्यानंतर पुरवठादार कंपनी नियुक्त केली जाते. त्यानंतर संबंधित कंपनीकडून शेतात सौरपंप बसवून तो कार्यान्वित केला जातो.
अर्ज मंजूर झाल्यानंतर पुरवठादार नियुक्त करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा रात्री-अपरात्री मोबाईलवर संदेश येतो. मात्र, तो संदेश पाहेपर्यंत संबंधित पुरवठादाराचा कोटा संपलेला असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुढील संदेशाची वाट पाहावी लागते आणि प्रक्रिया लांबणीवर पडते.
सौरपंप वेळेत न बसवल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुरवठादारांकडून अतिरिक्त त्रास दिला जात असल्याचे आरोपही होत आहेत. प्रत्यक्षात सौरपंप कार्यान्वित करताना लागणारे वीट, वाळू, सिमेंट व इतर साहित्य पुरवठादाराने उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना, ते साहित्य शेतकऱ्यांनाच आणण्यास सांगितले जात असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
एकीकडे पाणी उपलब्ध असूनही वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही, तर दुसरीकडे सौरपंपाच्या विलंबामुळे शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे सौरपंप योजनेतील अडचणी तातडीने दूर करून शेतकऱ्यांना वेळेत पंप उपलब्ध करून द्यावेत, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
.png)
0 Comments